निपुणचा ‘बापजन्म’
By Admin | Published: July 5, 2017 05:48 AM2017-07-05T05:48:07+5:302017-07-05T05:48:07+5:30
युवा आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बापजन्म’ १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण
युवा आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बापजन्म’ १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, सुमतिलाल शाह आणि ‘सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्स’तर्फे ही घोषणा करण्यात आली. ‘बापजन्म’ची प्रस्तुती ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’,‘आयडियाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘टाईम प्लीज’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची आहे. निपुण धर्माधिकारी हे आज घराघरात पोहोचलेले नाव आहे. ‘मराठी कास्टिंग काऊच’ या अत्यंत नावीन्यपूर्ण आणि वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून ते युवकांमध्येही लोकप्रिय झाले आहेत आणि त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी २००९ मध्ये ‘नाटक कंपनी’ या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शतकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन केले. त्या माध्यमातून शेक्सपिअरच्या परंपरेलाही उजाळा दिला गेला.
या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच, पण त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही त्यांना मानाचे स्थान मिळाले. भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुण यांची ख्याती आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यात ‘नौटंकी साला’ (२०१३) आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) यांचा समावेश आहे. ‘बापजन्म’ हा शब्द मराठी जनमानसांत लोकप्रिय आहे. निपुण यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘बापजन्म’ या आगामी चित्रपटाने रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. हा चित्रपट प्रचंड यश संपादन करेल, याबाबत काही शंका उरलेली नाही.