लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।।
By Admin | Published: November 14, 2016 03:41 AM2016-11-14T03:41:49+5:302016-11-14T03:41:49+5:30
ते दिवस काहीसे वेगळेच असतात. लहानपणी मी प्रचंड खेळायचे. चमचालिंबू हा माझा आवडता खेळ. त्याचबरोबर मी ज्या वेळी सिनिअर केजीमध्ये होते
सई ताम्हणकर -
ते दिवस काहीसे वेगळेच असतात. लहानपणी मी प्रचंड खेळायचे. चमचालिंबू हा माझा आवडता खेळ. त्याचबरोबर मी ज्या वेळी सिनिअर केजीमध्ये होते, त्या वेळी आई मला शाळेत सोडायला यायची. शाळा लगेच सुटायची म्हणून आई शाळेच्या शेजारील काकूकडे बसायची. त्या वेळी मी वर्गातल्या शिक्षकांना काही ना काही कारणे सांगून वर्गाच्या बाहेर यायचे आणि आई बसली आहे का काकूजवळ, हे चेक करायचे. आजही ही गोष्ट आठवली, की मलाच माझे फार हसू येते. खरंच ते दिवसच खूप भारी असतात.
अभिजित खांडकेकर
लहानपणी आपण सगळे टेन्शनमुक्त असतो. लहानपणी मात्र आई-वडील कुठेही चल म्हटले, निघायचो. आता, हेच दिवस मी खूप मिस करतो. त्याचबरोबर लहानपणी मी आणि माझी बहीण आम्ही खूप किडे करायचो. एकदा बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये साखर घातली. ज्या वेळी त्याचा बर्फ तयार झाला त्या वेळी त्याची चव पाहिली तर तो बर्फ थोडा खारट लागला. साखर टाकलेल्या पाण्याचा बर्फ खारट झाला, हा नवा शोध लावल्यामुळे मला या गोष्टीचा खूप आनंद झाला. पण नंतर कळाले, की त्यामध्ये माझ्या बहिणीने मीठ टाकले होते. आमच्या बहीणभावंडांच्या या किडेगिरीवर अजून ही सगळे हसतात.
प्रथमेश परब
लहानपणी मी खूप हट्टी होतो. तो दिवस अजून ही आठवतो. ज्या वेळी मी आई-वडिलांजवळ तीन चाकी सायकलचा हट्ट केला होता, त्या वेळी माझा सायकलचा हट्ट पूर्ण झाला नाही. त्यामुळे मी खूप आजारी पडलो. इतका ताप आला, की काही केल्या तो बराच होत नव्हता. मग आई-बाबांनी मला नवीन सायकल आणून दिली. त्यानंतर मी लगेच ठणठणीत झालो. लहानपणीची ही आठवण माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहणारी आहे.
अमृता खानविलकर
लहानपणीचे दिवस हे माझ्यासाठी खरंच गोल्डन डेज होते. माझे लहानपण पुण्यात गेले आहे. तिथेच माझ्या डान्समधील करिअरची सुझ्रुवात झाली. सोसायटीतला गणेशोत्सव मी खूप मिस करते. कारण त्या पाच दिवसांत विविध स्पर्धा असायच्या. त्या वेळी खूप धमाल आणि मस्ती करायचो. तसेच, गणेशोत्सवात मी स्वत:देखील डान्स करायचे आणि इतरांचेदेखील डान्स बसवायचे. त्यामुळे लहानपणीचा गणेशोत्सव, माझी सोसायटी आणि मित्रमंडळींसोबत मी पुण्यालादेखील खूप मिस करत असते.