जब्बार पटेल, ज्योती चांदेकर यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव

By Admin | Published: June 8, 2017 02:37 AM2017-06-08T02:37:41+5:302017-06-08T02:37:41+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड झाली

Jabbar Patel, Jyoti Chandekar's lifetime contribution to the Natya Parishad | जब्बार पटेल, ज्योती चांदेकर यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव

जब्बार पटेल, ज्योती चांदेकर यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड झाली आहे. १४ जून रोजी होणाऱ्या नाट्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी पुरस्कार प्रदान केले जातात. यंदाही रंगभूमीवर विविध विभागांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या रंगकर्मींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. याअंतर्गत, सर्वोत्कृष्ट लेखक (व्यावसायिक नाटक) विभागासाठी मनस्विनी लता रवींद्र (अमर फोटो स्टुडिओ), अभिजित गुरू (तीन पायांची शर्यत), शेखर ढवळीकर (के दिल अभी भरा नही), आनंद म्हसवेकर (यू टर्न-२), सुरेश जयराम (छडा) यांच्यात चुरस आहे. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी निपुण धर्माधिकारी (अमर फोटो स्टुडिओ), विजय केंकरे (तीन पायांची शर्यत), राजेश जोशी (कोड मंत्र), मंगेश कदम (के दिल अभी भरा नही), नीरज शिरवईकर / सुदीप मोडक (एक शून्य तीन), यांचे नामांकन झाले आहे. तर सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कारासाठी ‘तीन पायांची शर्यत’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘कोड मंत्र’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘एक शून्य तीन’ या नाटकांमध्ये स्पर्धा आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी सुमित राघवन (एक शून्य तीन), मंगेश कदम (के दिल अभी भरा नही), संजय नार्वेकर (तीन पायांची शर्यत), अमोल कोल्हे (बंधमुक्त), सौरभ गोखले (छडा), तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी शर्वरी लोहकरे (तीन पायांची शर्यत), मुक्ता बर्वे (कोड मंत्र), इला भाटे (यू टर्न-२), सखी गोखले (अमर फोटो स्टुडिओ), शर्मिष्ठा
राऊत (बंधमुक्त) यांचे नामांकन झाले आहे.
यासोबत विविध तांत्रिक विभागांसाठीही नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी चंद्रशेखर सांडवे, सुनील देवळेकर, अर्चना नेवरेकर, अविनाश खर्शीकर आणि संजय डहाळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Web Title: Jabbar Patel, Jyoti Chandekar's lifetime contribution to the Natya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.