मराठमोळ्या अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत, प्रदर्शनाच्या दिवशीच मिळालं गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 02:09 PM2017-09-22T14:09:36+5:302017-09-22T14:39:04+5:30
मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा न्यूटन हा चित्रपट भारताकडून ऑस्कर 2018 पुरस्काराच्या शर्यतीत असणार आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी भारकताकडून अधिकृतपणे न्यूटनची निवड करण्यात आली आहे.
मुंबई - मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा न्यूटन या सिनेमाची भारताकडून ऑस्कर 2018 पुरस्काराच्या शर्यतीत असणार आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृतपणे न्यूटनची निवड करण्यात आली आहे. फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म कॅटेगरीमध्ये न्यूटनला नामांकन मिळालं आहे. अभिनेता राजकुमार राव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अंजली पाटिल, रघुबीर यादव यांचाही तगडा अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो. विशेष म्हणजे आजच हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे एकप्रकारे प्रदर्शनाच्या दिवशीच सिनेमाला ऑस्करवारीचं गिफ्ट मिळालंय.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने आज याबाबत घोषणा केली. तेलगू सिनेमाचे प्रसीद्ध निर्माते सीव्ही रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. ऑस्करमध्ये पाठवण्यासाठी 26 चित्रपटांचा विचार झाला पण त्यापैकी न्यूटनची एकमताने निवड करण्यात आली अशी माहिती रेड्डी यांनी दिली. 22 सप्टेंबर म्हणजे आजच्याच दिवशी जवळपास 350 स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा समिक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सिनेमाचं डायरेक्शन आणि सिनेमेटोग्राफीचं कौतूक होतंय. निवडणूक मतदान यासारख्या गंभीर आणि वेगळ्या विषयाला चित्रपटात अत्यंत योग्यप्रकारे हाताळण्यात आलं आहे. तगड्या अभिनयासाठी राजकुमार रावचं सर्वांनीच कौतूक केलं आहे.
न्यूटनची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाल्याची माहिती स्वतः राजकुमार रावने ट्विटरवर दिली. ऑस्करसाठी भारताकडून न्यूटनची निवड झाली आहे हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे असं ट्विट त्याने केलं.
Very happy to share this news that #NEWTON is India's official entry to the #OSCARS this year. Congratulations team.
— Rajkummar Rao (@RajkummarRao) September 22, 2017
ऑस्करमध्ये जाणारे इतर भारतीय सिनेमे -
फॉरेन लॅन्ग्वेज कॅटेगरीमध्ये न्यूटनच्याआधी अपुर संसार (1959), गाइड (1965), सारांश (1984), नायकन (1987), परिंदा (1989), अंजलि (1990), हे राम (2000), देवदास (2002), हरिचन्द्र फैक्ट्री (2008), बर्फी (2012) आणि कोर्ट (2015)
केवळ तीन सिनेमेच अंतिम यादीपर्यंत पोहोचू शकले
यामध्ये महबूब खान यांचा मदर इंडिया (1957), मीरा नायरचा सलाम बॉम्बे (1988) आणि आशुतोष गोवारिकरचा लगान (2001)