पंडित भीमसेन जोशी स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2017 10:47 AM2017-01-24T10:47:45+5:302017-01-24T12:13:14+5:30

'भारतरत्न' पंडित भीमसेन जोशी यांचा आज (२४ जानेवारी) स्मृतिदीन.

Pandit Bhimsen Joshi Memorial Day | पंडित भीमसेन जोशी स्मृतिदिन

पंडित भीमसेन जोशी स्मृतिदिन

googlenewsNext
प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २४ - 'भारतरत्न' पंडित भीमसेन जोशी यांचा आज (२४ जानेवारी) स्मृतिदीन. धारवाड जिल्ह्यातील रोण येथे १४ फेब्रुवारी १९२२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गुरुराज व चुलते गोविंदाचार्य हे साहित्यिक होते आणि त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्यांच्या काळातील नाणावलेले गायक होते. भीमसेन यांना लहाणपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्यांच्यासाठी गायन शिक्षकाची नेमणूक केली; पण तेवढ्यावर समाधान न होऊन ते गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंधर, कलकत्ता इ. ठिकाणी भ्रमंती केली. काही काळ त्यांनी लखनौच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरीही केली. अखेरीस त्यांनी सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. त्यांनी  निरलसपणे गुरुसेवा करून अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. सवाई गंधर्वानीही त्यांना पाच वर्षे मनःपूर्वक तालीम दिली. 
 
सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक. त्यांनी भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खाँ यांच्या गायकीचे विशेष आत्मसात करून किराणा शैली समृद्ध केली. ही समृद्ध गायकी भीमसेन यांनी निष्ठेने आत्मसात केलीच; शिवाय त्या बरोबरच केसरबाई केसकर व अमीरखाँ यांच्या अनुक्रमे जयपूर व इंदूर गायकींचाही व्यासंग करून, त्यांतील लयकारीच्या, बोल फिरवण्याच्या व तानफिरक्क्यांच्या जाती आत्मसात केल्या. परिणामतः सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापचारीची व माफक आक्रमक अशी गायकी भीमसेनांनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासूनच पकड घेणारी अशी केली. त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यामुळेच संगितेतिहासात त्यांचे स्थान अजरामर राहील. आधुनिक भारतीय गायकांमध्ये लोकप्रियता व यश या दृष्टींनी भीमसेन यांचे नाव अग्रगण्य आहे. मध्वपीठातर्फे ‘संगीत-रत्न’ (१९७१), भारत सरकारची ‘पद्मश्री’ (१९७२), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (१९७६) यांसारखे मानसन्मानही त्यांना लाभले. त्यांच्या शिष्यवर्गामध्ये रामकृष्ण पटवर्धन, माधव गुडी, श्रीकांत देशपांडे आदींचा समावेश होतो.
 
भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.
 
भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.
 
त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्‍या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.
 
भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.
 
भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकीगायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.
 
अशा या महान गायकाचे सोमवार, जानेवारी २४, २०११ रोजी पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.
 
लोकमत समूहतर्फे त्यांना आदरांजली..!
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया, मराठी विश्वकोश 
 

 

Web Title: Pandit Bhimsen Joshi Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.