पीपली लाईव्हच्या सह दिग्दर्शकाला बलात्काराप्रकरणी अटक
By Admin | Published: June 21, 2015 04:12 PM2015-06-21T16:12:52+5:302015-06-21T16:12:52+5:30
पीपली लाइव्ह या चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी हे बलात्कारच्या आरोपांमुळे गोत्यात आले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - पीपली लाइव्ह या चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी हे बलात्कारच्या आरोपांमुळे गोत्यात आले आहे. एका अमेरिकन महिलेने फारुकी यांच्याविरोधात बलात्काराचे आरोप केले असून याप्रकरणी पोलिसांनी फारुकी यांना अटकही केली आहे.
दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यात एका अमेरिकन महिलेने महमूद फारुकी यांच्याविरोधात बलात्काराची लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फारुकींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मार्च २०१५ मध्ये फारुकी यांनी बलात्कार केल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी फारुकी यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने फारुकी यांना सहा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
महमूद फारुखी हे मुळचे उत्तरप्रदेशमधील गोरखपूरचे असून दिल्लीतील सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील ख्यातनान ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षण घेतले होते. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या पीपली लाईव्ह या चित्रपटाचे ते सह दिग्दर्शक व लेखक होते. पत्रकारितेतून बॉलीवूडमध्ये येणा-या अनुषा रिझवी या त्यांच्या पत्नी आहेत.