मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

By संजय घावरे | Published: May 2, 2024 03:41 PM2024-05-02T15:41:02+5:302024-05-02T15:44:46+5:30

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' हा मराठी सिनेमा रिलीज झाला आहे. वाचा कसा आहे हा सिनेमा

marathi movie Naach Ga Ghuma review starring Mukta Barve Namrata Awate | मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

Release Date: May 01,2024Language: मराठी
Cast: मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकूळ, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, सुनील अभ्यंकर, मधुगंधा कुलकर्णी
Producer: स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊतDirector: परेश मोकाशी
Duration: 2 तास 19 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवणाऱ्या परेश मोकाशीने आता मालकीणबाई आणि मोलकरीणबाईंच्या केमिस्ट्रीचा अचूक 'योग' जुळवून आणला आहे. या अनुषंगाने प्रथमच वर्किंग वूमन आणि होम वर्किंग वूमन म्हणजेच मोलकरीण बाईंच्या आयुष्यावर प्रकाश टाकला असून, घराघरातील प्रत्येक 'घुमा'ची गोष्ट सादर केली आहे.

कथानक : ही कथा आहे वर्कींग वूमन असलेल्या राणीची... या राणीचा राजा आनंद, तर राजकुमारी चिकू आहे. बँकेत नोकरी करणाऱ्या राणीला योगाची आवड आहे. राणीकडे आशाताई नावाची जीनी आहे, जी तिच्या पश्चात घराची जबाबदारी सांभाळून चिकूचंही सारं काही करते. आपल्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी राणीप्रमाणे वर्किंग वूमन असलेल्या आशाताईला कामावर यायला उशीर होणं, सारखं मोबाईलवर बोलणं, कॅाल रिसिव्ह न करणं यामुळे एकदा राणी-आशाताईंमध्ये वाद होतो. राणी आशाताईला कामावरून काढते. त्यानंतर काय होतं ते सिनेमात आहे.

लेखन-दिग्दर्शन : आजवर कधीही समोर न आलेल्या वनलाईनवर खुमासदार पटकथा लिहिताना दैनंदिन जीवनातील बारीक-सारीक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. संवादही अर्थपूर्ण आहेत. दैनंदिन जीवनातील परस्पर भिन्न असलेल्या दोन व्यक्तिरेखांवर प्रथमच सिनेमा बनला आहे. वर्किंग वूमनच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट मोलकरीणही वर्किंग वूमनच असल्याची जाणीव करून देतो. प्रत्येक वर्किंग वूमनला या चित्रपटात आपलं प्रतिबिंब दिसेल. १२ तास, २४ तास, वरची कामं करणाऱ्या अशी मोलकरीण बाईंची वर्गवारी दाखवली आहे. काही ठिकाणी थोडी अतिशयोक्ती झाल्यासारखी वाटते, पण त्याकडे दुर्लक्ष करता येईल. मोलकरीण असलेल्या कोणत्याही आशाचं जगणं इतकं सोपं मुळीच नाही. गीत-संगीत चांगलं आहे. 

अभिनय :मुक्ता बर्वेने सहजसुंदर अभिनयशैलीच्या बळावर राणीच्या व्यक्तिरेखेतील प्रत्येक पैलू पूर्ण ताकदीनिशी सादर केला आहे. रिक्षातील संभाषण, पोलिस स्टेशनमध्ये दाखवलेला विश्वास तसेच कुटुंब संकटात असल्यावर दाखवलेला राग सारं काही लक्ष वेधून घेतो. या संसारनाट्यात सारंगने सादर केलेला आनंदही शोभून दिसतो. मुक्ता-सारंगची केमिस्ट्रीही छान झाली आहे. मायराने चांगली साथ दिली आहे. आजवर विनोदी स्किटसमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नम्रता संभेरावने आशाताईंची व्यक्तिरेखा अतिरंजीतपणाचा स्पर्श होऊ न देता संयतपणे साकारली आहे. सुकन्या मोने आणि सुप्रिया पाठारेने सासूबाईंच्या भूमिका चांगल्या रंगवल्या असल्या तरी हे कास्टिंग थोडं खटकतं. कविता लाड, ललित प्रभाकरचा कॅमिओ आणि स्वप्नील जोशी आणि प्राजक्ता माळी यांचं गाणं चांगलं झालं आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, वातावरण निर्मिती, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : मसालापटांच्या चाहत्यांना आवडणार नाही

थोडक्यात काय तर मालकीण आणि मोलकरीण यांचा हा चित्रपट केवळ मनोरंजक नसून, दोन्ही बाजूंमधील वास्तव पडद्यावर सादर करणारा असल्याने एकदा अवश्य बघायला हवा.

Web Title: marathi movie Naach Ga Ghuma review starring Mukta Barve Namrata Awate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.