५७ शेतकऱ्यांनी जाणले भाजीपाला लागवड तंत्र
By admin | Published: March 30, 2017 02:03 AM2017-03-30T02:03:40+5:302017-03-30T02:03:40+5:30
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बाएफ मित्रा संस्थेच्या ५७ शेतकऱ्यांनी गडचिरोली येथील कृषी विज्ञान
कृषी विज्ञान केंद्राला भेट : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील शेतकरी
गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बाएफ मित्रा संस्थेच्या ५७ शेतकऱ्यांनी गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली व भाजीपाला लागवडीचे आधुनिक तंत्र जाणून घेतले.
भेटीदरम्यान उद्यान विद्या विषय विशेषज्ञ अनिल तारू यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या विविध प्रात्यक्षिकांविषयी तसेच पिकांविषयीची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला पिकाविषयी मार्गदर्शन केले. कोबी, वांगे, भेंडी यांची लागवड कशा पद्धतीने करावी, याबाबत माहिती दिली. पशु व दुग्ध शास्त्र विषय विशेषतज्ज्ञ डॉ. विक्रम कदम यांनी दूध वाढविण्यासाठी बरशिमचा उपयोग, गांडूळखत निर्मिती तसेच गांडूळ खताचे शेतीमधील महत्त्व पटवून दिले. गांडूळ खत निर्मिती करण्याचे आवाहन केले.
मुक्तसंचार गोठा कशा पद्धतीने तयार करावा, या प्रकारच्या गोठ्यामुळे जनावरांवर कोणता सकारात्मक परिणाम दिसून येतो, याविषयी मार्गदर्शन केले. पीक संरक्षण विषय विशेषतज्ज्ञ पुष्पक बोथीकर यांनी रब्बी पिकावर येणारे कीड व रोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भाजीपाला लागवड करताना घ्यावयाची काळजी, भाजीपाल्यावर येणारे रोग, त्याचबरोबर रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारायची कीटकनाशके याबाबत मार्गदर्शन केले.
कृषी अभियांत्रिकी विषय विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथोड यांनी शेतीसाठी उपयोगी असलेली विविध अवजारे कशा पद्धतीने वापरावी, त्यांचे शेतीमध्ये असलेले महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. मिनी पॉवर टिलर, धान रोवणी यंत्र, ग्रास कटर यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. जंगली जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी सोलर फेन्सींगबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी हितेश राठोड, प्रवीण नामुर्ते, जितेंद्र कस्तुरे, सुनीता थोटे, ज्योती परसुटकर उपस्थित होते. त्यांनी येथील सर्व कृषीविषयक कामाची माहिती जाणून घेतली. (नगर प्रतिनिधी)