सौभाग्य योजनेतून ६१० घरकूल उजाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:29 PM2018-02-17T23:29:07+5:302018-02-17T23:29:44+5:30
प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ६१० वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत अंधारात जीवन कंठीत असलेल्या नागरिकांच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पडला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील जवळपास २०० गावे विजेपासून वंचित होती. कोणत्याही परिस्थितीत या गावांना वीज पुरवठा करावा, असे निर्देश राज्य शासनाने दिल्यानंतर वीज वितरण कंपनीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत जवळपास १५० गावांमध्ये वीज पुरवठा केला आहे. वीज पुरवठा झाला असला तरी आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश नागरिक वीज जोडणी घेण्यास तयार नव्हते. अशा नागरिकांना केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी करून दिली जात आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना मोफत वीज जोडणी करून दिली जात आहे. तर इतर लाभार्थ्यांना ५०० रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. ५०० रूपये शुल्क लाभार्थ्यांनी त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरायचे आहे. मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबाची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जात गणनेच्या आधारे करण्यात येणार आहे. योजनेत वीज पुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बील भरणे बंधनकारक आहे. थकबाकीमुळे कायमचा पुरवठा खंडीत झालेले घर किंवा तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरीत होणारी घरे किंवा शेतातील घरे या योजनेस पात्र ठरणार नाही.
सौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागातील ५०९, गडचिरोली विभागातील १०१ असे एकूण ६१० कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. वीज जोडणी झालेले बहुतांश लाभार्थी एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी व धानोरा या तालुक्यातील आहेत. सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्टÑात ११ लाख ६४ हजार १३५ लाभार्थ्यांना वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थ्यांना पारंपरिक पध्दतीने तर २१ हजार ५६ लाभार्थ्यांना अपारंपरिक पध्दतीने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील घरे तसेच पूर्वी मंजूर झालेल्या पंडीत दिन दयाल ग्रामज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक घुगल, गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, गडचिरोली विभागाचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम व आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनात जास्तीत जास्त गावांना वीज पुरवठा व जास्तीत जास्त नागरिकांना वीज जोडण्या देण्याचे प्रयत्न सुरू असल्याने १५० पेक्षा अधिक गावांना वीज पुरवठा झाला आहे.
दुर्गम भागातील गावांना प्राधान्य
सौभाग्य योजनेंतर्गत आलापल्ली विभागात येणाऱ्या पालेकसा, गटेपल्ली, रूमालकसा, कोकामेटाटोला, उमरगट्टा, कोठागोडा, झुरी, करमटोला, कांडला, सिडामटाला, कोठारी, गुरेटोला, रायपेटा, कोरलामाल, कोरलाचेक, किष्टय्यापल्ली, रमेश गुडम, करजेली, एकराखुर्द, येनकामडा, उमानूर, मारपल्ली, बसवापूर, रायपल्ली, जिमलगट्टा, येरमनार या गावांचा समावेश आहे. तर धानोरा तालुक्यातील बंदूर, धुरमूडटोला, सोनपूर, रानकट्टा, मार्जिनटोला, तारामटोला, मगदंड, सावरगाव, पन्नेमारा, उमरपाल टोला, आरमुरकस, सालईटोला या गावांचा समावेश आहे. ज्या गावात वीज पुरवठा करणे शक्य नाही, अशा गावांना सौरऊर्जा संच दिले जात आहे.