आरमोरी नगर परिषदेचे अस्तित्व वांद्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:11 AM2018-01-21T00:11:17+5:302018-01-21T00:11:29+5:30
अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या प्रस्तावित आरमोरी नगर परिषदेसमोरील अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. अरसोडा ग्रामपंचायतने या नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार दिल्यामुळे २५ हजार लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या प्रस्तावित आरमोरी नगर परिषदेसमोरील अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. अरसोडा ग्रामपंचायतने या नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार दिल्यामुळे २५ हजार लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
आरमोरीला नगर पंचायतऐवजी नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल झाली होती. ती याचिका निकाली काढताना आॅगस्ट २०१७ मध्ये न्यायालयाने याबाबतचा निर्णय चार आठवड्यात राज्य शासनाने घ्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार १२ सप्टेंबर २०१७ रोजी आरमोरी नगर परिषदेची अधिसूचना जारी केली. यावेळी आरमोरी (लोकसंख्या १८,५०४), शेगाव (३८४२), अरसोडा (२६२१) आणि पालोरा (५४०) या चार गावांना नगर परिषदेत सामावून घेण्याचे जाहीर केले. याचवेळी संबंधित ग्रा.पं.च्या काही हरकती असतील तर त्यांनी आपले आक्षेप जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यास सांगितले. त्यानुसार अरसोडा ग्रामपंचायतने आक्षेप घेतला होता. सोबतच आरमोरी नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार देणारा ठराव घेऊन तो जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. जिल्हाधिकाºयांनी तो ठराव राज्य शासनाकडे पाठविला. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही अरसोडा ग्रामपंचायतचा हा ठराव शासनाकडे पाठविण्याचे ठरले. त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- तर २०२१ च्या जनगणनेची प्रतीक्षा
कोणतीही नगर परिषद अस्तित्वात येण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या किमान २५ हजार असावी अशी अट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार आरमोरीची लोकसंख्या १८ हजार ५०४ तर शेगाव आणि पालोरा मिळून एकूण लोकसंख्या २२ हजार ८८६ इतकी होते. त्यामुळे अरसोड्याला वगळून नगर परिषद जाहीर करताना लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर तसे झाल्यास २०२१ मध्ये होणाºया जनगणेची प्रतीक्षा करून नंतर वाढीव लोकसंख्या जाहीर होईपर्यंत आरमोरीवासीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.