हिवताप आजारात एटापल्ली तालुका संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:28 AM2017-10-27T00:28:14+5:302017-10-27T00:28:34+5:30

गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून जंगलाशेजारी अनेक गावे वसलेली आहेत. शिवाय शासकीय आश्रमशाळाही जंगलालगत आहे.

Atapalli taluka sensitive for malaria | हिवताप आजारात एटापल्ली तालुका संवेदनशील

हिवताप आजारात एटापल्ली तालुका संवेदनशील

Next
ठळक मुद्देजिल्हाभरात ३ हजार ६७७ रूग्ण आढळले : प्रशासनाच्या नऊ महिन्यांच्या तपासणी अहवालात उघड

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून जंगलाशेजारी अनेक गावे वसलेली आहेत. शिवाय शासकीय आश्रमशाळाही जंगलालगत आहे. जंगलालगतच्या भागात हिवतापाची रूग्णसंख्या अधिक आहे. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक ५२९ हिवताप रूग्णांची संख्या आढळून आली आहे. त्यामुळे हिवताप रूग्णांच्या बाबतीत एटापल्ली तालुका अधिक संवेदनशील असल्याचे दिसून येते.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातर्फे दर महिन्याला ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरी भागात जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयस्तरावर हिवताप रोगाबाबत लोकांची तपासणी केली जाते. जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरातील एकूण ७ लाख ४ हजार ९३७ नागरिकांची हिवताप तपासणी करण्यात आली. यामध्ये ३ हजार ६७७ रूग्ण हिवताप पॉझिटीव्ह आढळून आले. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ७१४ व पीएफ स्वरूपाच्या २ हजार ९६३ रूग्णांचा समावेश आहे.
एटापल्ली तालुक्यातील गट्टा, कसनसूर, तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत एकूण ४१ हजार १६५ रूग्णांची हिवताप तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ५२९ रूग्ण हिवताप पॉझिटीव्ह आढळून आले. यात पीव्ही स्वरूपाचे १०५ व पीएफ स्वरूपाच्या ४२४ रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तालुक्यात गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक २६५ रूग्ण हिवताप पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
हिवतापामध्ये पीव्ही व पीएफ असे दोन प्रकार असून पीएफ हा धोकादायक व गंभीर प्रकार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वेक्षणाअंती गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत पीएफ स्वरूपाचेच हिवताप रूग्ण अधिक आढळून आले आहेत. पीव्ही स्वरूपाच्या हिवताप रूग्णांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासह आरोग्य यंत्रणेला हिवतापाबाबत कमालीचे दक्ष राहण्याची गरज असून प्रभावी उपाययोजना आवश्यक आहे.
आश्रमशाळांना लाखावर मच्छरदाण्या वाटणार
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय गडचिरोलीकडे यंदा १ लाख १९ हजार इतक्या मच्छरदाण्या अलिकडेच उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय या कार्यालयाकडे गतवर्षीच्या ४५ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत. एकूण १ लाख ६४ हजार इतक्या मच्छरदाण्या हिवताप रूग्ण असलेल्या संवेदनशील भागात वितरित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली, अहेरी, भामरागड या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांना या मच्छरदाण्या वितरित करण्यात येणार आहेत. उर्वरित मच्छरदाण्या संवेदनशील दुर्गम भागातील नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.
शहरी भागात दीड हजार रूग्ण
जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालय स्तरावरही जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत रूग्णांची हिवताप तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण १ हजार ५६६ रूग्ण हिवताप पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सर्वाधिक ४८२ रूग्ण भामरागड ग्रामीण रूग्णालयांतर्गत आढळून आले आहेत.

Web Title: Atapalli taluka sensitive for malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.