शेतमाल तारण कर्ज योजना सुरू
By Admin | Published: March 20, 2017 01:31 AM2017-03-20T01:31:05+5:302017-03-20T01:31:05+5:30
धानाच्या काढणी हंगामानंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नाही.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : कृषी विभागाचे आवाहन
गडचिरोली : धानाच्या काढणी हंगामानंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत सुलभ शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतमालाच्या काढणी हंगामानंतर शेतकऱ्यांकडील धान्याचा साठा ज्या प्रमाणात कमी होतो त्या प्रमाणात शेतमालाचे बाजारभाव वाढतात. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी घेतात. शेतमालाच्या उतरत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच सुगीच्या कालावधीत व पुढील टप्प्यात शेतमालाचे बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. शेतमालाचे बाजारभाव कोसळत असताना किमान आधारभूत किमतीच्या आधारे शेतकऱ्यांना सदर तारण कर्ज देऊन त्यांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सदर तारण कर्ज योजनेत तूर, मूग, उडीद, सोयाबिन, सूर्यफूल, चना, धान, करडई, ज्वारी, बाजरी, मका, काजू, बेदाणा व हळद आदी शेतमालाचा समावेश आहे. सदर कर्ज योजनेसाठी पणन मंडळाने ५० कोटी रूपयांची तरतूद केली असून ही योजना राबविण्यासाठी ८३ बाजार समित्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतमालानुसार कर्जाची मुदत व व्याजदर
सोयाबिन, तूर, मूग, उडीद, चना, धान, करडई, सूर्यफूल, हळद आदी शेतमालाच्या बाजारभावानुसार एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम अथवा किमान आधारभूत किमतीपेक्षा बाजारभाव कमी होत असल्यास आधारभूत किमतीनुसार होणाऱ्या रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम अशी कर्ज वाटपाची मर्यादा आहे व या कर्जाची मुदत सहा महिने असून व्याजदरही सहा टक्के आहे. ज्वारी, बाजरी, मका व गहू या शेतमालाच्या बाजारभावानुसार ५० टक्के अथवा ५०० रूपये प्रती क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार आहे. याचा व्याजदर सहा टक्के आहे. काजू बी व बेदाणा या शेतमालाच्या तारण कर्जाची मुदत सहा महिने असून व्याजदरही सहा टक्के ठेवण्यात आला आहे.