जोगीसाखरात तीव्र पाणी टंचाई
By admin | Published: June 13, 2014 12:09 AM2014-06-13T00:09:20+5:302014-06-13T00:09:20+5:30
येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या
जोगीसाखरा : येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी आणून नागरिक आपली तहान भागवितात. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने कामाचा नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.
भर उन्हाळ्यात नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनातर्फे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम काही दिवसापासून सुरू आहे. परंतु काम सुरू केल्यानंतर आठ ते दहा दिवस नळाचे पाणी कायमचे बंद करण्यात आले होते. लोकमतमध्ये पाणी टंचाईसंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच घागरमोर्चा निघेल या भीतीने नदीचे वाहते दुषित पाणी नळामार्फत गावात सोडले गेले. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नव्हते. नदीचे नळामार्फत सोडलेले पाणी पिण्यास वापरू नये, अशी दवंडी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत देणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक नागरिकांनी दुषित पाण्याचा वापर केल्याने किरकोळ आजार किंवा साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नळामार्फत गढूळ पाण्याचा पुरवठा करून नागरिकांना शांत करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने प्रयत्न केला. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांनी पाण्याचा वापर करणे टाळले. त्यामुळे गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या रोपवाटिकेतील पाणी पिण्यासाठी नागरिकांना आणावे लागत आहे.
गावातील अनेक नागरिक नदीतील चुव्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करीत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जोगीसाखरा येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात टंचाई असते. याची जाणीव ग्रामपंचायत प्रशासनाला असतांनाही ऐन उन्हाळ्यात वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने का सुरू केले,असा प्रश्नही गावकरी करीत आहेत.
जोगीसाखरा येथील लोकसंख्या ३ हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे गावात असलेले पाण्याचे स्त्रोत अत्यल्प प्रमाणात आहेत. गावात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाईची समस्या कधी सुटणार, असा सवालही गावातील नागरिक प्रशासनाला करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन त्वरित सोडवावी, अशी मागणी जोगीसाखरा येथील नागरिकांंकडून केली जात आहे. (वार्ताहर)