वन्यप्राण्यांकडून धानाची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:31 PM2017-12-11T23:31:16+5:302017-12-11T23:31:35+5:30
वैरागड येथील किल्ल्यालगत असलेल्या झाडाझुडूपांत दिवसभर रानडुकरे आश्रयाला असतात. रात्रीच्या सुमारास परिसरातील धान पुंजण्याची नासधूस करतात. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.
आॅनलाईन लोकमत
वैरागड : वैरागड येथील किल्ल्यालगत असलेल्या झाडाझुडूपांत दिवसभर रानडुकरे आश्रयाला असतात. रात्रीच्या सुमारास परिसरातील धान पुंजण्याची नासधूस करतात. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले. त्यातही जे उत्पादन हाती येण्याची शक्यता होती ते सुद्धा रानडकरांकडून नासधूस केली जात असल्याने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास हिसकावला जात आहे. वन्य जीवांच्या शिकारीबाबत वन विभागाचे अत्यंत कडक नियम असल्याने वन्य जीवांच्या शिकारींच्या प्रमाणात मोठ्या प्र्रमाणावर घट झाली आहे. रानडुकरामुळे दरवर्षी पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे रानडुकरांच्या शिकारीबाबत कायदा शिथिल करावी, अशी मागणी होती. यासाठी आघाडी शासनाच्या काळात रानडुकरांच्या बाबतीत शिथिलता देणारा कायदा करण्यात आला होता. परंतु राज्यात विद्युत पुरवठ्याने वन्य प्राण्यांचे शिकार होण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच वाघाच्या शिकारीचे प्रमाण उघडकीस आल्यानंतर कायदा अधिक कडक करण्यात आला. वैरागड परिसरातील ज्या शेतातीत धान, तूर पिकाची खरोखरच हानी झाली. त्यांच्या धानाचे पंचनामे करून वरिष्ठांकडे अहवाल आर्थिक भरपाईसाठी वन विभागामार्फत पाठविण्यात आले आहेत.
वडधा परिसरातही नुकसान
परिसरातील टेंभा, चांभार्डा, मरेगाव, मौशिखांब, डार्ली, बोरी येथील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. या शेतीत रात्रीच्या सुमारास डुकरे येऊन धानाच्या गंजीची नासधूस करतात. तसेच रबी पिकाचेही नुकसान करतात. त्यामुळे वन विभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून वन विभागाकडे होत आहे.
रानडुकरांमुळे पिकांची हानी होत असेल तर वन विभागाच्या अटी, शर्तीनुसार रानडुकराची शिकार करता येते. परंतु इतर वन्य जीवांना इजा देखील होऊ नये. वन्यजीवांना धोका झाल्यास कायदेशीर कारवाई होते.
- एम. एन. मेश्राम, क्षेत्र सहायक वैरागड.