कुंभार समाज बांधवांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:17 AM2017-12-16T00:17:29+5:302017-12-16T00:18:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुंभार समाजाचा भटक्या विमुक्त जमाती (एनटी) प्रवर्गाचा समावेश करण्यात यावा, माती कला बोर्ड स्थापन करावे, आदीसह विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्टÑ कुंभार समाज महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली. मात्र गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्टÑातील कुंभार समाज प्रगतीपासून वंचित आहे. संघटनेच्या पदाधिकाºयांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र राज्य शासनाकडून कुंभार समाजाला न्याय देण्यासंदर्भात कोणतेही ठोस निर्णय अद्यापही घेण्यात आले नाही. त्यामुळे महाराष्टÑ कुंभार समाज महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे देण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांनी राज्य शासनाच्या धोरणावर आक्रमक शैलीत टिका केली. आंदोलनात महासंघाच्या नागपूर विभागाचे कार्याध्यक्ष एकनाथ बुरबांदे, अध्यक्ष संजय रामगुंडेवार, कार्याध्यक्ष दिलीप ठाकरे, सचिव नरेंद्र ठाकरे, ताराबाई कोटांगले, गोपाळराव खोबरे, किशोर बुरबांदे, रामचंद्र वरवाडे, रवींद्र गिरोले, कौशल्या चौधरी आदींसह जिल्हाभरातील कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धरणे आंदोलनात मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना मागण्यांचे निवेदन दिले.