गोंडवाना सैनिकी स्कूल करणार अपेक्षापूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:15 AM2017-11-11T00:15:48+5:302017-11-11T00:15:59+5:30
गोंडवाना सैनिक स्कूलकडून भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेलाच नाही तर संपूर्ण जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती या शाळेतील विविध क्षेत्रात पारंगत असणारे विद्यार्थी नक्कीच करतील,....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना सैनिक स्कूलकडून भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेलाच नाही तर संपूर्ण जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती या शाळेतील विविध क्षेत्रात पारंगत असणारे विद्यार्थी नक्कीच करतील, असा विश्वास सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकरराव लाकडे यांनी व्यक्त केला.
येथील गोंडवाना सैनिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित ‘सैनिकोत्सव २०१७’ अंतर्गत क्रीडा सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजीव गोसावी तर अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी मदन टापरे, भूषण कळमकर, जि.प.हायस्कूल सोनसरीचे प्राचार्य एम.के.देशमुख, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी आणि प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मनोज ताजने, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके, तालुका क्रीडा समन्वयक खुशाल मस्के, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे आणि पर्यवेक्षक अजय वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोसावी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी खेळ आवश्यक आहेत. शारीरिक स्वास्थ्यासोबत संघभावना, शिस्त लागण्यासाठी खेळ आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
सुरूवातीला दीप प्रज्वालन आणि क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून आंतरशालेय क्रीडा स्पर्धेेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील चार हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी निदेशक सलाम खान यांच्या मार्गदर्शनात शिस्तबद्ध पथसंचलन सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक भुपेंद्र चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शाहीद शेख यांनी तर आभार रविंद्र कोरे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा प्रशिक्षक आणि वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन बघून उपस्थित मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन व शिक्षकांचे कौतुक केले.
१० सांघिक तर १७ वैयक्तिक खेळ
चार दिवस चालणाºया या क्रीडा स्पर्धेमध्ये १० सांघिक प्रकाराचे खेळ आणि १७ वैयक्तिक प्रचाराचे खेळ घेण्यात येणार आहेत. सांघिक खेळ प्रकारामध्ये परेड, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, रस्सीखेच, हँडबॉल आणि रिले तर वैयक्तिक खेळ प्रकारात १०० ते १५०० मीटर रनिंग, हर्डल्स, बुद्धीबळ, कॅरम, उंच उडी, लांब उडी, शुटींग, अडथळ्याची शर्यत, गोळाफेक, थाळीफेक, घोडेस्वारी, कराटे आणि वुशी या खेळांचा समावेश आहे. चार दिवस हे खेळ चालणार आहेत.
मुलींचेही सैनिक स्कूल असावे
यावेळी मार्गदर्शन करताना क्रीडा अधिकारी टापरे म्हणाले, गोंडवाना सैनिक स्कूलचे रोपटे २०१४ मध्ये लावले होते. त्या रोपट्याचा वटवृक्ष होताना मी पाहतो आहे. क्रीडा क्षेत्रात आज या शाळेने वेगळा ठसा उमटविला आहे. या शाळेची टीम मैदानात उतरली की समोरच्या टीममध्ये धडकी भरते. या संस्थेने आता गडचिरोलीत मुलींचीही सैनिक स्कूल उभारावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.