धक्कादायक! गडचिरोलीतील बालरुग्णालयात सहा महिन्यांत १०० बालमृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:48 PM2018-10-31T17:48:15+5:302018-10-31T17:49:43+5:30
गडचिरोली येथील अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या शासकीय महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
गडचिरोली - येथील अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या शासकीय महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या मृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. पाच महिन्यात १०० पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू या रुग्णालयात झाला आहे. एवढ्या संख्येने बालमृत्यू होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हा संशोधनाचा विषय असला तरी दुप्पट रुग्णसंख्येचा भार आणि त्यामुळे वैद्यकीय सेवा देताना रुग्णांची होत असलेली हेळसांड हे सुद्धा एक प्रमुख कारण मानले जात आहे.
लोकार्पणानंतर मे २०१८ पासून हे रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित झाले. त्यानंतर जून महिन्यात ३ बालकांचा मृत्यू झाला. जुलै मध्ये २८ बालकांचा, आॅगस्ट मध्ये ३२, सप्टेंबर मध्ये २२ तर आॅक्टोबर महिन्यात जवळपास २० बालकांचा मृत्यू झाला आहे. यात बाळंतपणादरम्यान आणि जंतूसंसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृतांमधील ९५ पेक्षा जास्त मुले ० ते १ वर्ष वयाचे आहेत.
१०० खाटांच्या या रुग्णालयात सद्यस्थितीत २१७ पेक्षा जास्त रुग्ण भरती आहेत. कधीकधी हा आकडा ३०० वर पोहोचतो. बाळंतपणासाठी येणाºया महिलांसोबतच इतर आजारांच्या महिला आणि बालकांवरही येथे उपचार केले जातात. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांसोबतच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णही याच रुग्णालयात येतात. भरती रुग्णांसोबतच बाह्यरुग्ण विभागाचाही ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत १०० खाटांच्या रुग्णालयासाठी असलेले वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी २०० ते ३०० रुग्णांना सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. रुग्णांची ही हेळसांड थांबवून रुग्णालयाची सेवा अधिक सक्षम व चांगल्या दर्जाची करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
साडेतेरा लाख लोकसंख्येच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी हे एकमेव महिला व बाल रुग्णालय आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा ताण वाढत आहे. २४ तास रुग्णसेवा मिळावी यासाठी रुग्णालय परिसरात असलेले जि.प.सभापती, पं.स.सभापतींचे शासकीय निवासस्थान दुसरीकडे हलवून तिथे वैद्यकीय अधिकाºयांची निवास व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
- डॉ.देवराव होळी, आमदार, गडचिरोली