पर्यटन स्थळांच्या देखभालीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
By admin | Published: May 22, 2016 01:05 AM2016-05-22T01:05:29+5:302016-05-22T01:05:29+5:30
गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा, टिप्पागड, खोब्रामेंढा, वैरागड येथे जुने किल्ले व मंदिरे आहेत. या जुन्या ऐतिहासिक वास्तूंची देखभाल करण्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शासन सूस्त : ऐतिहासिक किल्ले दुर्लक्षित
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा, टिप्पागड, खोब्रामेंढा, वैरागड येथे जुने किल्ले व मंदिरे आहेत. या जुन्या ऐतिहासिक वास्तूंची देखभाल करण्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मार्कंडा देवस्थानच्या जुन्या दगडांना रसायनाने धूण्यात आले. व सद्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. परंतु जिल्ह्यातील अन्य पुरातन वास्तूंची पडझड होत आहे. ऐतिहासिक किल्ल्याचीही दुरवस्था आहे.
आरमोरी तालुक्यात वैरागड येथे १६ व्या शतकात चंद्रपूर येथील गोंड राजा बल्लाळशहा याने हिरे व सोन्याच्या रक्षणासाठी १२ एकर परिसरात किल्ल्याचे बांधकाम केले. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाने किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याची तटबंदी उदध्वस्त झाली असून जुन्या मंदिरांचे दगडं पडत आहे.
कुरखेडा तालुक्यात टिप्पागड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे नंद्यावर बसलेल्या शंकराची मूर्ती आहे. तसेच मोठा जुना तलाव असून या ठिकाणाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या तलावाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय निर्माण होऊ शकते. परंतु या दृष्टिकोनातून आजवर शासनाने कधीही टिप्पागडच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही. तसेच खोब्रामेंढा या पर्यटन स्थळाच्याही विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मार्कंडा देवस्थान परिसरात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या निधीतून भक्तांसाठी निवारा उभारण्यात आला होता. परंतु या कामाला पुरातत्व विभागाने अडथळा आणून ते काम बंद पाडले.
जिल्ह्यात पर्यटन उद्योगाला मोठा वाव आहे. परंतु शासनाचे व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटन स्थळाचा विकास झाल्यास येथील अनेक बेरोजगारांना उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो. (शहर प्रतिनिधी)
नियोजनबध्द कृती आराखड्याची गरज
गडचिरोली जिल्हा वन संपत्तीने नटलेला असून अनेक नद्या, नाल्यांमुळे जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून जुने मंदिर आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची दूरवस्था झाली आहे. परिणामी सोयीसुविधेअभावी जिल्हाबाहेरील पर्यटक जिल्ह्यात फिरकत नाही. जिल्ह्यातील पर्यटनस्थळाचा विकास
होण्यासाठी भाजप सेना युती सरकारने नियोजनबध्द कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाचा विकास करावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.