दोन वर्षात ३७० किलोमीटरच्या रस्त्यांचे डांबरीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:04 AM2018-01-05T00:04:55+5:302018-01-05T00:05:06+5:30
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे आता वेगाने मार्गी लावली जात आहेत. यासोबतच पुढील दोन वर्षाकरिता ३७० किलोमीटरच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे आता वेगाने मार्गी लावली जात आहेत. यासोबतच पुढील दोन वर्षाकरिता ३७० किलोमीटरच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या कामांचा प्रस्ताव आमदारांच्या सहमतीने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ती कामेही सुरू होणार आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्याचे जाळे सुरळीत करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली. मात्र या जिल्ह्यात अधिकाºयांची कमतरता आणि कंत्राटदारांच्या समस्यांमुळे गेल्या दोन वर्षात कामे चांगलीच रखडली. ही कामे आमदारांनी निवडलेली असल्याने आमदारांनाही नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. मात्र आता ही कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेने कंबर कसली आहे.
या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली २०१५-१६ मधील २० रस्त्यांची कामे मे २०१८ पर्यंत तर २०१६-१७ मधील ५१ प्रलंबित कामे डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे इतर योजनांच्या निधीप्रमाणे या कामांचा निधी शासनाकडे परत जात नाही. तो नागपूर येथील अधीक्षक अभियंत्यांकडे सुरक्षित असतो. त्यांच्याच कडून या कामाची बिले काढली जातात.
दरवर्षी आमदारांकडून गावांची निवड करून त्याचे अंदाजपत्रक तयार करणे, शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे आणि नंतर पुढील प्रक्रिया करणे यात बराच वेळ जातो. यामुळे पुढील दोन वर्षांचे नियोजन आधीच करणे सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता दिलीप देवळे यांनी सांगितले. त्यात २०१७-१८ साठी १८५ किलोमीटर तर २०१८-१९ साठी १८५ किलोमीटर रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी घेण्यासाठी अंदाजपत्रक बनविले जात आहे. त्यातील यावर्षीच्या टप्पा १ मधील ९० किलोमीटरचे अंदाजपत्रक बनविले असून ते लवकरच मंजुरीसाठी पाठविले जाणार आहे.