आबांंमुळे नक्षलवाद नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:18 AM2017-11-16T01:18:52+5:302017-11-16T01:23:13+5:30

Naxalism in control of AIIMS | आबांंमुळे नक्षलवाद नियंत्रणात

आबांंमुळे नक्षलवाद नियंत्रणात

Next
ठळक मुद्देपवारांचे प्रशंसोद्गार : राष्टÑवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून रूळलेला नक्षलवाद नियंत्रणात आणण्याचे काम केवळ कायदा व सुव्यवस्थेने शक्य नव्हते. विकासाचा अभाव आणि मागासलेपण हे या समस्येचे मूळ आहे. त्याचा फायदा घेत काही शक्तींनी आपले प्रस्थ वाढविले. पण आर.आर.पाटलांनी स्वत:हून या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागून कोट्यवधी रुपयांची कामे या जिल्ह्यात घडवून आणली. जिल्ह्याचे पालकत्व गांभीर्याने घेऊन विकासाच्या वाटेवर आणले, म्हणून येथील अनेक समस्या नियंत्रणात आल्या, असे प्रशंसोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा समन्वयिका भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, या जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला गोदावरी नदीवरील पूल आणि आबांनी केलेल्या इतर कामांचाही आवर्जुन उल्लेख केला. यावेळी त्यांनी राष्टÑीय कृषी धोरणावरही टीका केली. कृषी विकासाचा दर ३.१५ टक्के आहे. तो ८ टक्के असायला पाहिजे. राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात नाही. नागपूरसारख्या शहरात क्राईम रेट वाढला आहे. पण गृहखाते स्वत:कडे ठेवलेले मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलायला तयार नाही. ही असंवेदनशिलता असल्याचे ते म्हणाले. शेतकºयांची क्रयशक्ती सुधारण्यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेतीच्या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याची गरज पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.
पत्रपरिषदेनंतर अभिनव लॉनमध्ये झालेल्या जाहीर सभेतही पवारांनी इतर महापुरूषांसोबत दिल्लीतील संसदेच्या आवारात बिरसा मुंंडा यांचा पुतळा लावल्याचे आवर्जुन सांगितले. स्व.आर.आर. पाटील यांचे कार्य पाहता या जिल्ह्यात त्यांचा पुतळा उभारण्याचा मानस धर्मरावबाबांनी बोलून दाखविला. त्या पुतळ्याच्या अनावरणाला मी येणार, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख आपल्या भाषणात आर.आर.पाटलांच्या कामांचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या सरकारने ओबीसींचे आरक्षण १९ व ६ टक्के केल्याचा प्रश्न तसेच जिल्ह्यातील सिंचनाच्या सुविधांकडे पवार यांचे लक्ष वेधले. भाग्यश्री आत्राम यांनीही आपल्या भाषणात पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिलेल्या महिला आरक्षणामुळेच आज माझ्यासारखी महिला जि.प.अध्यक्ष किंवा सभापती होऊ शकल्याचे सांगितले.
सुरूवातीला क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसमोर अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वालन करण्यात आले. तसेच सर्व पाहुण्यांचे बांबूपासून बनविलेली आदिवासींची पारंपरिक टोपी आणि तीरकमान देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने भलामोठा तिरंगी फुलांचा हार घालून शरद पवारांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी तर संचालन रिंकू पापळकर यांनी केले.
पवारांच्या हस्ते रक्तदात्यांचा गौरव
जिल्ह्याच्या काही युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘गडचिरोली जिल्हा रक्तपेढी’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार करून जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात रक्तपुरवठा करण्याचे कार्य डिसेंबर २०१६ पासून सुरू केले. त्या युवकांचा बुधवारी शरद पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्तपुरवठा करणाºया युवकांपैकी निलेश पटले, अक्षय भिष्णूरकर, लिलाधर भरडकर, सौरभ भडांगे, भूषण फरांडे, आशिष म्हशाखेत्री, पंकज फुलबांधे या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपचे मार्गदर्शक रविंद्र वासेकर, रिंकू पापडकर, अजय कुंभारे आदी उपस्थित होते. या गौरवाने युवकांना आणखी प्रेरणा मिळेल व आणखी जोमाने हा ग्रूप रक्तदानाचे श्रेष्ठ कार्य पुढे करणार, अशी ग्वाही यावेळी युवकांनी दिली.

Web Title: Naxalism in control of AIIMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.