कंत्राटदार येनगंटीवर बलात्काराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:37 PM2017-12-11T23:37:18+5:302017-12-11T23:37:37+5:30
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील रेती कंत्राटदार आणि नाग विदर्भ समिती व भाजपशी जवळीक असलेल्या अजय येनगंटी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील रेती कंत्राटदार आणि नाग विदर्भ समिती व भाजपशी जवळीक असलेल्या अजय येनगंटी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील एका अल्पवयीन युवतीचे त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
पीडित युवतीचे १५ व्या वर्षीच लग्न झाले होते. परंतू ती सासरी न नांदता पुन्हा माहेरी आली. तिच्या आईने सासरी जाण्याचा आग्रह धरत तिला घरी ठेवण्यास नकार दिला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या युवतीला येनगंटी यांच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. परंतू त्या युवतीशी अजय येनगंटी याने लग्नाचे आमिष देत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचारामुळे अखेर तिला घोट येथील जिल्हा बाल न्याय मंडळात ठेवण्यात आले. तिथे त्या युवतीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. येनगंटी हा पालकमंत्र्यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. भाजपने मात्र तो पक्षाच्या कोणत्याही पदावर नसल्याचे स्पष्ट केले. गडचिरोली पोलिसांनी येनगंटी याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून हे प्रकरण आसरअल्ली पोलिसांकडे वर्ग केले.