ग्रामीण रूग्णालय समस्याग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:34 AM2018-01-14T00:34:10+5:302018-01-14T00:34:21+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयातील वैैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच येथे आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या समस्यांकडे लक्ष देऊन त्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी जि. प. सदस्य सारिका आईलवार व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : येथील ग्रामीण रूग्णालयातील वैैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच येथे आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या समस्यांकडे लक्ष देऊन त्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी जि. प. सदस्य सारिका आईलवार व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
पं. स. उपसभापती नीतेश नरोटे यांनी गुरूवारी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असता, येथे अनेक समस्या आढळून आल्या. ग्रामीण रूग्णालयातील वैैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रुंगारे व डॉ. उगडे अनेकदा गैरहजर राहतात. त्यांची एटापल्ली येथे प्रतिनियुक्ती असल्याने रूग्णालय आरबीएसके डॉक्टरांच्या भरवशावर चालविले जात आहे. सदर डॉक्टर ग्रामीण रूग्णालयात काम करणार तर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुका नक्षलग्रस्त, डोंगराळ भागात विस्तारला असल्याने बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनेक रूग्णांना रूग्णवाहिका मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एटापल्ली येथील डॉक्टरांची रिक्त पदे भरावी, रूग्णवाहिकेवर वाहनचालक नियुक्त करावे, शववाहिका उपलब्ध करावी, १०८ रूग्णवाहिका द्यावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पदे भरावी, नेत्र तपासणीकरिता डॉक्टर उपलब्ध करून द्यावे, एक्स-रे मशीनची सेवा उपलबध करावी, वॉटर फिल्टर सुविधा द्यावी, जेनेरिक औषधी केंद्र रूग्णालयात उपलब्ध करावे, येत्या १५ दिवसांत मागणी पूर्ण करावी, अन्यथा ग्रामीण रूग्णालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा जि. प. सदस्य सारिका आईलवार, आविसंचे तालुकाध्यक्ष नंदू मट्टामी, आविसंचे जिल्हा सल्लागार प्रवीण आईलवार, नीतेश नरोटे, श्रीकांत चिप्पावार, मंगेश हलामी, रामा तलांडी, योगिता दुर्वा, अश्विनी आईलवार, पोवरी आत्राम, केशव कुळयेटी, बालू आत्राम, भिवा मट्टामी, तलांडे यांनी दिला आहे.