सात शाळाबाह्य मुले शाळेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:19 AM2017-09-13T00:19:44+5:302017-09-13T00:19:44+5:30
धानोरा मार्गावरील बसस्थानक परिसरात हंगामी व्यवसायासाठी स्थलांतरीत झालेल्या सात मुलांना संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा मार्गावरील बसस्थानक परिसरात हंगामी व्यवसायासाठी स्थलांतरीत झालेल्या सात मुलांना संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अन्वये कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कांपा येथल १० कुटुंब गडचिरोली येथे मागील १५ दिवसांपासून वास्तव्याने आहेत. त्यांच्यासोबत ६ ते १४ वयोगटातील सात मुले आढळून आली. सदर मुले कोणत्याच शाळेत जात नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही बाब सर्व शिक्षा अभियानचे सहायक कार्यक्रम अधिकारी आर. व्ही. आकेवार यांच्या लक्षात आल्यानंतर सदर माहिती त्यांनी उपशिक्षणाधिकारी एम.एन. चलाख यांना दिली. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानच्या चमूला सोबत घेऊन उपशिक्षणाधिकारी चलाख व सहायक कार्यक्रम अधिकारी आकेवार यांनी भेट दिली.
उपशिक्षणाधिकारी एम.एन. चलाख यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण घेणे विद्यार्थ्यांचा हक्क आहे. ज्या गावी बिºहाड जाईल, त्या गावच्या शाळेत सदर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली जाईल. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करावे, असे आवाहन पालकांना केले. पालकांच्या परवानगीनंतर विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले. विद्यार्थ्यांमध्ये कृष्णा ठाकूर उईके रा. आमगाव, निखील जिगल्या आत्राम, सिमरन जिगल्या आत्राम, नेहा सेवन सिडाम, शिरशहा सेवन सिडाम चौघेही रा. मूल तसेच पल्लवी ठाकूर उईके, फूल रूपेश आत्राम रा. कांपा या सात मुलांना प्रवेश देण्यात आला. मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी जिल्हा समन्वयक भाऊराव हुकरे, एस. जी. नांदेकर, साधन व्यक्ती मंजू वासेकर यांनी सहकार्य केले. शिक्षणाधिकारी जयंत बाबरे यांनी कौतुक केले आहे.