मासिक सभेत ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:25 PM2018-09-06T23:25:39+5:302018-09-06T23:26:18+5:30
एटापल्ली नगर पंचायतीने दिलेले कचरा उचलण्याचे कंत्राट रद्द करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी गुरूवारी झालेल्या मासिक सभेदरम्यान सभागृहाताच ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायतीने दिलेले कचरा उचलण्याचे कंत्राट रद्द करावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी गुरूवारी झालेल्या मासिक सभेदरम्यान सभागृहाताच ठिय्या आंदोलन केले.
एटापल्ली नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या एटापल्ली शहर, एटापल्ली टोला, कृष्णार, वासामुंडी, मरकल या वॉर्डांमधील कचरा उचलण्याचे कंत्राट अहेरी येथील बाबा सिंग यांना देण्यात आले आहे. कंत्राट देऊनही कचरा उचलला जात नाही. नगर पंचायतीमध्ये घंटागाड्या असतानाही त्यांचा वापर केला जात नाही. सदर घंटागाड्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. घाणीमुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. दर महिन्याला लाखो रूपयांचे बिल दिले जात असताना कंत्राटदार मात्र कचऱ्याची उचल करीत नाही. त्यामुळे नगर पंचायतीचे लाखो रूपये वाया जात आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. कचरा उचलण्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी होत होती. गुरुवारी नगर पंचायतीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कचऱ्याचा मुद्दा अतिशय गाजला. सर्व नगरसेवकांनी सदर कंत्राट रद्द करावे, अशी मागणी मासिक सभेत लावून धरली.
भाजप गटनेते दीपक सोनटक्के, नगरसेवक विजय नल्लावार, रमेश मट्टामी, राहुल गावडे, सुनीता चांदेकर, रेखा मोहुर्ले, किरण लेकामी यांनी आंदोलन केले. नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम यांनी कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे लिखीत स्वरूपात दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मासिक सभेला मुख्याधिकारी एस.एन.सिलमवार, उपाध्यक्ष रमेश गम्पावार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.