आरडातील बोनालू उत्सवात हजारोंची गर्दी, डोक्यावर कलश घेऊन भाविकांची प्रदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:27 PM2018-12-25T17:27:35+5:302018-12-25T17:27:48+5:30

आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २३ व २४ डिसेंबर रोजी बोनालू (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Thousands of crowds celebrate Bonalu festival in Arada | आरडातील बोनालू उत्सवात हजारोंची गर्दी, डोक्यावर कलश घेऊन भाविकांची प्रदक्षिणा

आरडातील बोनालू उत्सवात हजारोंची गर्दी, डोक्यावर कलश घेऊन भाविकांची प्रदक्षिणा

Next

- नागभूषणम चकिनारपुवार
सिरोंचा (गडचिरोली) : तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २३ व २४ डिसेंबर रोजी बोनालू (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सिरोंचा तालुक्यातील व तेलंगणा राज्यातील जवळपास 10 हजार भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता. 

आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. यावर्षी सुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यात आहेत. उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने लागली होती. भक्तगण मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करीत होते. आपली मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी स्वामींना साकडे घालीत होते. बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताली तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो. 

मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. सदर जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम या गावात आयोजित केले जातात. जत्रा चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी आरडा गावातील सरपंच रंगू बापू, सदाशिव रंगुवार, अशोक रंगुवार, किरण वेमुला यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सिरोंचा पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास सुपे, उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी उत्सव मंडळ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. 

Web Title: Thousands of crowds celebrate Bonalu festival in Arada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.