रावणाची प्रतिकृती कोसळून तीन मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:25 AM2017-09-30T00:25:07+5:302017-09-30T00:25:21+5:30
विजयादशमीनिमित्त रावण दहनासाठी रावणाची प्रतिकृती सजविण्याचे काम सुरू असताना प्रतिकृती कोसळल्याने तीन मजूर जखमी झाल्याची घटना देसाईगंज येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : विजयादशमीनिमित्त रावण दहनासाठी रावणाची प्रतिकृती सजविण्याचे काम सुरू असताना प्रतिकृती कोसळल्याने तीन मजूर जखमी झाल्याची घटना देसाईगंज येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
देसाईगंज येथील रावण दहन समितीच्या मार्फत विजयादशमीला रावण दहन केले जाते. यासाठी देसाईगंज येथील आदर्श विद्यालयाच्या परिसरात सुमारे ४० फूट उंचीचा रावण उभारण्याचे काम सुरू होते. उभ्या रावणाच्या प्रतिकृतीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू असतानाच अचानक रावणाची प्रतिकृती कोसळली. त्यामुळे ४० फूट उंचावर काम करणारे तीन मजूर प्रतिकृतीसोबत खाली कोसळले. ते किरकोळ जखमी झाले. त्यांना देसाईगंज येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अनुचित घटनेमुळे शनिवारी रावण दहन न करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. दरम्यान याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. येथील रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता येते. मात्र रावण दहन होणार नसल्याने आनंदावर विरजन पडले.