गोव्यातील ड्रायव्हिंग स्कूल लोकायुक्तांच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:41 PM2018-08-23T13:41:35+5:302018-08-23T13:41:44+5:30
ड्रायव्हिंग स्कूलचा कारभार चक्क किचनमधून चालत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकायुक्तांच्या कारवाईत उघड झाला. १९८९ च्या केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा हा भंग आहे.
पणजी : ड्रायव्हिंग स्कूलचा कारभार चक्क किचनमधून चालत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकायुक्तांच्या कारवाईत उघड झाला. १९८९ च्या केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा हा भंग आहे. प्राप्त माहितीनुसार म्हापसा शहरात 27 मोटर ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत. यापैकी ७ ड्रायव्हिंग स्कूल्सचे परवाने या ना त्या कारणामुळे रद्द करण्यात आलेले आहेत. दोन ड्रायव्हिंग स्कूल्स बंद पडलेली आहेत. सुरक्षित ड्रायव्हिंगचा अभाव, योग्य ती उपकरणे न ठेवणे, ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी वर्ग न घेणे आदी कारणांवरुन परवाने रद्द केलेले आहेत.
लोकायुक्तांनी ड्रायव्हिंग स्कूलमधील गैरकारभाराची स्वेच्छा दखल घेऊन कारवाई चालवली आहे. सासष्टी, तिसवाडी तालुक्यांमध्ये आरटीओ अधिका-यांनाही लोकायुक्तांसमोर हजर रहावे लागले आहे.
दरम्यान, ड्रायव्हिंग स्कूलमधील वाढत्या गैरकारभाराची दखर घेऊन आरटीओनेही राज्यभरातील १३५ ड्रायव्हिंग स्कुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. आरटीओने हे काम गुरगांव, हरियाणा येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या संस्थेकडे सोपविले आहे. रस्ता सुरक्षेच्या बाबतीत केंद्रीय मोटर वाहन कायदा तसेच संबंधित नियमांचे सर्व निकष या स्कुलांकडून पाळले जातात की नाही, वाहन चालवण्याचे योग्य प्रशिक्षण दिले जाते की नाही हे कडक निकष लावून तपासले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स देणे हा केवळ नाममात्र सोपस्कार राहू नये याचीही दक्षता घेतली जाईल.
जे ड्रायव्हिंग स्कूल या ऑडिटमध्ये नापास होतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रसंगी त्यांचे परवानेही रद्द केले जातील, असा इशारा वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी दिला. येत्या महिन्यात हे ऑडिट सुरू होणार आहे. काही ड्रायव्हिंग स्कूलचा दर्जा इतका खालावलेला आहे की त्यांचे असे ऑडिट होणे ही काळाची गरज होती. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या संस्थेची स्थापना २00६ मध्ये मानेसर, हरियाणा येथे झाली. मानेसर येथे या संस्थेची दोन केंद्रे आहेत. ही स्वायत्त संस्था असून केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणा-या ‘नाटिस’चा विभाग आहे. ही संस्था पॉवरट्रेन, फोटोमेट्री, आवाजाचे कंपन आदी बाबतीत दर्जेदार सेवा देते असे सांगण्यात आले.