गोव्यात डिसेंबरमध्ये फेस्टीव्हलचीच धूम, लाखो पर्यटकांना पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 11:26 AM2017-12-01T11:26:55+5:302017-12-01T13:06:53+5:30
पूर्ण डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे सोहळे आणि फेस्टीव्हल्स गोव्यात पार पडणार आहेत. एकामागून एक फेस्टीव्हल्स आयोजित केले जाणार असून लाखो पर्यटकांसाठी हा इव्हेन्टचा महिना म्हणजे मोठी पर्वणीच आहे.
- सदगुरू पाटील
पणजी - पूर्ण डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे सोहळे आणि फेस्टीव्हल्स गोव्यात पार पडणार आहेत. एकामागून एक फेस्टीव्हल्स आयोजित केले जाणार असून लाखो पर्यटकांसाठी हा इव्हेन्टचा महिना म्हणजे मोठी पर्वणीच आहे. शासकीय पातळीवरून महोत्सवांची जय्यत तयारी सुरू आहे.
7 डिसेंबरला प्रथम फिशफेस्टीव्हल होईल. रोज त्यानिमित्ताने करमणुकीचे व सांस्कृतिक कार्यक्रम पणजीतील प्रसिद्ध बांदोडकर मैदानावर होणार आहेत. केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग हेही उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील विविध जातींचे मासे या फेस्टीव्हलमध्ये पर्यटकांना पहायला मिळतील. शिवाय गोव्यातील मच्छीमारांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेता येतील. चार दिवस हा महोत्सव चालेल.
जगात प्रसिद्ध असलेल्या सेंट झेवियर्सचे फेस्त येत्या 4 डिसेंबरला होत आहे. त्यावेळीही हजारो पर्यटक जुनेगोवेमध्ये उपस्थित असतील. सुरक्षेच्यादृष्टीने सरकारने सगळी तयारी केली आहे. पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. जगातून पर्यटक व भाविक सेंट ङोवियरच्या जात्रेसाठी येत असतात. भाविकांचे आगमन सुरू झाले आहे.
7 डिसेंबरपासून गोवा कला आणि साहित्य हा महोत्सव होणार आहे. लिटररी फेस्टीव्हल अशा नावाने हा सोहळा ओळखला जातो. देशभरातील साहित्य अकादमीने मान्यता दिलेले अनेक इंग्रजी, हिंदी, मराठी, कोंकणी साहित्यिक त्यात भाग घेतात. राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले दोनापावल हे अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अजय देवगणच्या सिंगम चित्रपटाचे शुटिंगही दोनापावल येथे झाले होते. त्याच भागात गोवा इंटरनॅशनल सेंटर असून तिथे हा महोत्सव होईल. 10 डिसेंबर्पयत तो चालेल.
इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल म्हणजे ईडीएम हे सुद्धा गोव्यातील युवकांमध्ये लोकप्रिय ठरू लागले आहेत. सुमारे पन्नास हजार पर्यटक ईडीएममध्ये सहभागी होतात. येत्या 27 डिसेंबरपासून उत्तर गोव्यातील वागातोर समुद्रकिनारी ईडीएम फेस्टीव्हल होणार आहे. जोरदार संगीताच्या तालावर अखंडीतपणो पर्यटक या फेस्टीव्हलमध्ये नृत्य करतात. काहीवेळा अंमली पदार्थाचाही वापर होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच्या काळात आलेल्या आहेत.
गोव्यात 31 डिसेंबरची रात्र तर लाखो पर्यटकांकडून गाजविली जाते. देशभरातील बडे उद्योगपती, बॉलिवूडमधील कलाकार मंडळी तसेच अनेक राजकीय नेते नववर्ष साजरे करण्यासाठी यावेळीही गोव्यात येणार आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारी भागांतील सगळी तारांकित हॉटेल्स सध्या नववर्षाचे आगमन साजरे करण्यासाठी तयारी करू लागली आहेत. 30 व 31 डिसेंबर रोजी रात्री त्यानिमित्ताने गोव्यात अनेक कार्यक्रम होतील.
गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. डिसेंबर महिना तर पर्यटकांचाच असतो. नाताळ सणाचीही तयारी गोव्यात सुरू असून डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात पर्यटक नाताळचा आनंद लुटतील.