गोव्यात पर्यटकांकडून फुटपाथवर स्वयंपाक, स्थानिकांचा जोरदार आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 07:19 PM2017-12-09T19:19:52+5:302017-12-09T19:20:04+5:30
गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून गोवा सरकार जगभरात जाहिरात आणि रोड शो करत असले तरी, प्रत्यक्षात अजुनही अगदी किरकोळ खर्च करणारे पर्यटक गोव्यात जास्त संख्येने येत असल्याचे आढळून येते.
पणजी- गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून गोवा सरकार जगभरात जाहिरात आणि रोड शो करत असले तरी, प्रत्यक्षात अजुनही अगदी किरकोळ खर्च करणारे पर्यटक गोव्यात जास्त संख्येने येत असल्याचे आढळून येते. रविवारी तर पणजी व परिसरातील भागांमध्ये फुटपाथवर स्वयंपाक करताना अनेक पर्यटक आढळले. स्थानिकांनी अशा पर्यटकांना आक्षेप घेतला आहे.
पणजी व परिसरात सरकारने इफ्फीनिमित्ताने फुटपाथ अगदी स्वच्छ व दुरुस्त केले आहेत. अनेक ठिकाणी चांगल्या टाईल्स घातल्या आहेत. देशी पर्यटक आपल्या बसगाड्या व अन्य वाहने रस्त्याच्याबाजूने उभ्या करतात व या फुटपाथवर थेट शेगडी ठेवून स्वयंपाक करतात असे रविवारी स्थानिकांना आढळून आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा पर्यटकांचे फोटोही सोशल साईटवर टाकले आहेत आणि गोव्यातील पर्यटन व्यवसायाची हीच का ती चांगली सुरूवात असे प्रश्न विचारले आहेत. पदपथांवर रांगेत पर्यटकांनी जेवण तयार करण्याची भांडी ठेवली असल्याचेही आढळून आले.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर तर अशा पर्यटकांच्या सध्या रांगा लागल्या आहेत. वाहने उभी करून वाहनांच्या मागे आडोशाला स्वयंपाक तयार केला जातो. तिथेच जेवण केले जाते. मग तिथेच सगळा कचरा व शिल्लक अन्न पदार्थ टाकून दिले जातात. हीच स्थिती काही प्रमाणात वागातोर, बागा, कांदोळी, सिकेरीच्या पट्टय़ात दिसून येते. पर्यटकांना उघडय़ावर मद्यपान तसेच उघडय़ावर स्वयंपाक करू दिला जाणार नाही, असे दोन महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. काही सामाजिक कार्यकत्र्यानी अशा पर्यटकांच्या वाहनांचे क्रमांक दिसतील अशा पद्धतीनेही वाहनांचे फोटो काढून ते फोटो सरकारच्या पर्यटन खात्याला पाठवले आहेत. काही पर्यटक पदपथांवर नव्हे तर किनाऱ्यांवर बसून तिथेच स्वयंपाक करत आहेत. गोव्यात येतानाच ते मोठ्या प्रमाणात भांडी व कडधान्य घेऊन येतात. गोव्यात सध्या फिश फेस्टीव्हल सुरू आहे. त्यानिमित्तानेही पर्यटकांची वर्दळ पणजी-कांपाल-मिरामार-दोनापावल या पट्टय़ात वाढली आहे. राज्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. करंजाळेच्या किनारपट्टीत पर्यटक उघडय़ावर मद्यप्राशन करताना आढळून येत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी रविवारी अंजुना येथील किनारपट्टीत छापा टाकला व बेन शोशेन योसफ या विदेशी पर्यटकाला 80 ग्रॅम चरस बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.