सरकारी अर्जांवर दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम, काँग्रेसचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 01:33 PM2018-02-02T13:33:51+5:302018-02-02T13:34:07+5:30
गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.
पणजी : गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत शांताराम नाईक म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय लोकशाहीविरोधी होते. त्यांनी भारताच्या मुक्तीलढ्याला विरोध केला होता. ते कट्टर जातीयवादी होते. सरकारी अर्जांवर अशा व्यक्तीची छबी म्हणजे लोकशाहीचा आणि देशाच्या मुक्ती लढ्याचा अपमान आहे. शांताराम यांनी असाही आरोप केला की, पंडित दीनदयाळ यांनी त्यावेळी असे म्हटले होते की 'मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व विसरावे आणि हिंदू रितीरिवाजानुसार या देशात गुलाम म्हणून राहावे.' अशा अशा व्यक्तीची पूजा करणे गैर आहे. एका काँग्रेस कार्यकर्त्याने वाळू उपशासाठी खाण खात्यात अर्ज केला असता त्या अर्जावर उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम आढळून आला. पत्रकार परिषदेसाठी हा कार्यकर्ता उपस्थित होता. त्याने हा अर्ज पत्रकारांना दाखवला. सरकारच्या अन्य योजनांसाठी असलेल्या अर्जावरही अशाच पद्धतीचे उपाध्याय यांची छबी असलेले होलोग्राम असल्याचे आढळून आले आहे, असे शांताराम यांनी सांगितले.
दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांची भरती चालली आहे त्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप शांताराम यांनी केला असून दक्षता खात्याने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात 40 कनिष्ठ लिपिक आणि 24 डेटा एंट्री ऑपरेटर जागा दोन ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहेत त्यासाठी युवक युवतींनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. या भरतीत मोठा भ्रष्टाचार चालला असून 20 लाख रुपयांप्रमाणे पर्यंत दर चालला आहे, असा आरोप शांताराम यांनी केला. एक तर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीसाठी दक्षता खात्याकडे सोपवावे किंवा दक्षता खात्याने याची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे
दरम्यान राज्यात नारळाचे दर वाढल्याने महिला काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला नावे ठेवून हेटाळणी केल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा समाचार घेतला आहे. एकीकडे मोदी सरकार स्टार्ट अप योजनेंतर्गत महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देते तर दुसरीकडे पर्रिकर महिला उद्योजकांची हेटाळणी करतात, असा आरोप शांताराम यांनी केला. महिला काँग्रेसची केलेली हेटाळणी म्हणजे टाळणे मोदी यांच्या धोरणाचा अपमान आहे असे ते म्हणाले.