मनोहर पर्रीकर 5 वर्षांनंतर होणार निवृत्त ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2017 01:36 PM2017-03-29T13:36:25+5:302017-03-29T13:50:09+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पाच वर्षानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती पत्करण्याची दाट शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत त्यांनी स्वतः दिलेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 29 - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पाच वर्षानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती पत्करण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी स्वत: तसे स्पष्ट संकेत दिले असून आपण पुढील पाच वर्षानंतर मुख्यमंत्रीपदी असणार नाही, असेही विधान केले आहे. गोव्याच्या आणि देशाच्याही राजकीय क्षेत्रात हा विषय सध्या चर्चेत आहे.
पर्रीकर सध्या गोव्यात भाजपाप्रणीत आघाडी सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांचे आघाडी सरकार चालवण्याची कसरत पर्रीकरांना करावी लागत आहे. या सरकारमध्ये भाजपाचे स्वत:चे केवळ 13 आमदार आहेत.
डिसेंबर 1955 मध्ये जन्मलेले पर्रीकर हे आता 61 वर्षे वयाचे आहेत. कुठल्याही राजकारण्याने 65 ते 70 वर्षे वयोगटामध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्त व्हावे, असे आपले मत असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी एका राष्ट्रीय इंग्रजी दैनिकास दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याचा विचार करावा व 65 ते 70 वर्षापर्यंतच निवडणुकीच्या राजकारणात रहावे. उगाच दीर्घकाळ राहण्यात अर्थ नाही, असे पर्रीकर म्हणालेत. गोव्यातील सध्याचे आघाडी सरकार पाच वर्षे टीकेल. मी स्वत: पाच वर्षानंतर मुख्यमंत्रीपदी राहणार नाही, अशीही पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
जर मी गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आलो नसतो तर दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून काम सुरू ठेवले असते पण सध्याचा केवळ एकच टर्म मी दिल्लीत राहिलो असतो हे मी अगोदरच स्पष्ट केले होते, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
आयआयटी पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असलेले पर्रीकर हे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरतात. त्यांच्यानंतर दिल्लीचे अरविंद केजरीवाल हे दुसरे आयआयटी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले मुख्यमंत्री आहेत. (प्रतिनिधी)