मनोहर पर्रीकरांचे पुत्र निवडणूक लढवण्यास तयार; पक्षाच्या आदेशाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 09:03 PM2019-04-11T21:03:41+5:302019-04-11T21:05:10+5:30
पणजी विधानसभा मतदारसंघात पुढील महिन्यात पोटनिवडणूक
पणजी : दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मोठे पुत्र उत्पल पणजी मतदारसंघातून लढण्यास स्वर्गीय तयार झाले आहेत. एकदा पक्षाचा आदेश आल्यानंतर ते त्याविषयी घोषणा करतील, असे भाजपच्या बहुतांश कार्यकर्त्यांचे मत आहे. भाजपने उत्पलना उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात श्रीपाद नाईक यांचा प्रचार करण्याची सूचना केली. यानंतर उत्पलने लगेच प्रचार सुरू केला.
पणजीत येत्या 19 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. उत्पलने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे म्हणून गेले काही दिवस भाजपच्या पणजीतील कार्यकर्त्यांनी उत्पलशी संवाद साधला व त्याचे मन वळवले, असे त्याच्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत सहानुभूतीचे वातावरण आहे. कारण मनोहर पर्रीकर 24 वर्ष पणजीचे आमदार होते. याबद्दल पत्रकारांनी उत्पल यांना विचारले असता, आपल्याला पक्षाने पोटनिवडणूक लढवण्याची सूचना केलेली नाही. त्यामुळे आपण काही बोलत नाही, असे ते म्हणाले. आपल्याला श्रीपाद नाईक यांचे प्रचार काम करण्यास सांगितले व ते आपण करत आहे, असे उत्पल यांनी नमूद केले.
विजय व बाबूश यांचा संघर्ष
पणजी पोटनिवडणुकीच्या विषयावरून प्रथमच उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई व माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. विजय व बाबूश हे एकमेकांचे इतकी वर्षे एकदम मित्र होते. विजय यांनीच गेल्या निवडणुकीवेळी मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात बाबूशने लढू नये म्हणून प्रयत्न केले व बाबूशला फॉरवर्ड पक्षात प्रवेश दिला. पर्रीकर यांनी निवडणुकीनंतर लगेच बाबूशसाठी ग्रेटर पणजी पीडीएची स्थापना केली व बाबूश यांना पीडीएचे चेअरमनपद दिले. विजय यांनी आता पुन्हा उत्पल यांना सहानुभूती दाखवली आहे. बाबूश यांनी पणजीत लढण्याचा धोका पत्करू नये, कारण पर्रीकर यांचा वारसा पुढे चालवण्याचा हक्क फक्त उत्पल यांनाच आहे, असे सरदेसाई म्हणाले. मात्र बाबूश यांनी विजय यांची ही सूचना मान्य केली नाही. आपण पणजीत लढणारच, उगाच प्रत्येकवेळी वारशाच्या गोष्टी कुणी बोलू नयेत. वारसा लोकांवर लादण्याची खेळी खेळू नका, कोण आमदार हवा ते मतदारांनीच ठरवू द्या, असे बाबूश म्हणाले. एकंदरीत विजय व बाबूश यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे संकेत मिळतात.