गोव्यात नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 11:55 AM2018-01-08T11:55:23+5:302018-01-08T11:55:55+5:30
गोव्यातील काही नद्यांचे प्रवाह हे प्रदूषित झाले असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आढळून आले आहे.
- सदगुरू पाटील
पणजी- गोव्यातील काही नद्यांचे प्रवाह हे प्रदूषित झाले असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला आढळून आले आहे. मंडळाने ही गोष्ट सरकारचे जलसंसाधन खाते, आरोग्य खाते तसेच काही ग्रामपंचायती व पालिकांच्या नजरेस आणून दिली आहे. प्रदूषित नद्यांच्या क्षेत्रत किंवा अशा नद्यांच्या किनारी भागांत येणाऱ्या गावांमध्ये विविध प्रकारची उपाययोजना प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य खाते व जलसंसाधन खात्याने मिळून सूचवली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी, अस्नोडा, डिचोली, शापोरा, वाळवंटी, साळ, खांडेपार व म्हापसा या आठ नद्यांमधील पाण्यातील प्रदूषणाच्या प्रमाणाचा अभ्यास केला आहे. सर्वच नद्या प्रदूषित झालेल्या नाहीत पण काही नद्या काही ठराविक भागांमध्ये प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. नॅशनल वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग कार्यक्रमाखाली गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ गोव्यातील नद्यांचा 49 ठिकाणी नद्यांतील पाण्याच्या दर्जावर देखरेख ठेवत आहे. या शिवाय राष्ट्रीय नदी संवर्धन कार्यक्रमाखाली तीन ठिकाणी पाण्याचा दर्जा तपासला जातो. पाण्याचे नमूने घेऊन त्याचा अभ्यास केला जातो. या नद्यांच्या आधारे गोव्यातील पाणी पुरवठा व्यवस्था चालते. पाणी प्रक्रिया प्रकल्प चालतात. औद्योगिक वसाहतींमध्ये जे जलस्त्रोत आहेत, त्यांचाही दर्जा तपासला जातो.
नद्यांचे यापुढील प्रदूषण रोखण्यासाठी शहरी भागांना मलनिसारण व्यवस्था पुरवावी असे प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंसाधन खाते व आरोग्य खात्याने मिळून ठरवले आहे. म्हापसा, पर्वरी, फोंडा, न्हावेली वगैरे भागातील मलनिसारणविषयक प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण करायला हवेत असेही या खात्यांना अपेक्षित आहे. ज्या ग्रामपंचायती नद्यांच्या किनारी भागांमध्ये येतात त्यांना सीवेज सकर टँकर्स पुरवावेत असेही यापूर्वी ठरले आहे. काही पंचायतींमध्ये प्राधान्याने सार्वजनिक शौचालये पुरवावीत असेही ठरले. काही लोक आपल्या घरांचे, हॉटेलांचे, रेस्टॉरंटचे सांडपाणी नद्यांमध्ये सोडतात व त्यामुळेही प्रदूषण होते. काही लोक नद्यांमध्ये नेऊन कचरा टाकतात. आरोग्य खात्याने अशा लोकांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या व त्यांची उत्तरेही आली. मात्र त्यानंतर मोठीशी पाऊले सरकारी पातळीवरून उचलली गेली नाहीत.
माशेल ते वळवई, अस्नोडा ते शिरसई, डिचोली ते कुडचिरे, पेडणो ते मोरजी, फोंडा ते ओपा, म्हापसा ते बिठ्ठोणा, खारेबांद ते मोबोर, वाळवंटी,साखळी-डिचोली ते पर्ये अशा पट्टय़ातील नद्यांतील पाण्यावर देखरेख ठेऊन प्रदूषण तपासले जात आहे.