म्हादई पाणीप्रकरणी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे गोव्याला समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 02:29 PM2018-02-04T14:29:22+5:302018-02-04T14:29:46+5:30
म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. कर्नाटक किंवा महाराष्ट्र आम्ही मोठी राज्ये आहोत त्यामुळे लहान राज्यांची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
पणजी - म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. कर्नाटक किंवा महाराष्ट्र आम्ही मोठी राज्ये आहोत त्यामुळे लहान राज्यांची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
ह्यम्हादईह्ण गोव्यासाठी संजीवनी आहे आणि या राज्याचे अनेक पायाभूत प्रकल्प पाण्यावर अवलंबून आहेत. म्हादईचा वाद तीन राज्यांमध्ये असला तरी गोव्याला निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असल्याचे ते म्हणाले. या बाबतीत कर्नाटकने आधी गोवा सरकारबरोबर आणि नंतर महाराष्ट्राबरोबर चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
केसरकर पुढे असेही म्हणाले की, ह्यतिळारी धरण माझ्या सावंतवाडी मतदारसंघात आहे. परंतु या धरणावरुन कधीही गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात वाद झालेला नाही. गोव्याला या धरणाचे ७६ टक्के तर महाराष्ट्राला २४ टक्के पाणी मिळते तरीही सर्व काही सुरळीत चालले आहे.ह्ण महाराष्ट्राकडून कर्नाटक आणि गुजरातला मागणीनुसार पाणी दिले जाते, अशी पुस्तीही त्यानी जोडली. म्हादईचा जेथे उगम खानापूर तालुक्यातून होतो.
केसरकर पुढे म्हणाले की, सीमावाद सोडविण्यासाठी बेळगांव शहराचे दोन भाग करावेत, असे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुचविले होते. परंतु तसे होऊ शकले नाही. तसे झाले असते तर खानापूर तालुक्यासह या भागातील अन्य तालुक्यांचे संदर्भच बदलले असते. सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. या भागातील ८५६ गावांमधील लोकांना त्यांची मातृभाषा असलेल्या मराठीतून कर्नाटकने सरकारी दस्तऐवज द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.