ब्लॅकमेलिंग, आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 08:10 AM2019-07-11T08:10:06+5:302019-07-11T08:10:39+5:30
'भाजपा त्यांच्या घटक पक्षांबरोबर असुरक्षित होता, हे या घटनेतून उघड झाले.'
पणजी : गोव्यात काँग्रेसच्या दहा फुटीर आमदारांनी विधिमंडळ पक्ष भाजपामध्ये विलीन केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जळजळीत प्रतिक्रिया देताना भाजपाने ब्लॅकमेलिंग करून तसेच आमिषे दाखवूनच आमदार फोडल्याचा आरोप केला आहे.
ते म्हणाले की, भाजपा त्यांच्या घटक पक्षांबरोबर असुरक्षित होता, हे या घटनेतून उघड झाले. विधानसभेत स्वतःकडे पुरेसे संख्याबळ असतानाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशा प्रकारची अनैतिक राजकीय खेळी करतात यावरून आगामी विधानसभा अधिवेशनात विरोधकांना सामोरे जाण्याचे बळ त्यांच्याकडे नव्हते, त्यांना भीती वाटत होती, हे उघड झाल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी केली.
काँग्रेसचे आमदार भाजपात गेले त्यांच्या बाबतीत ब्लॅकमेलिंग, दबावतंत्र तसेच आमिषे दाखवण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यांचा कमकुवतपणा हेरुन हे सर्व केलेले आहे . भाजपा सत्तेचा करीत असलेला गैरवापरही यातून ठळकपणे दिसून येतो तसेच मग्रुरी ही दिसते, असे आरोप गिरीश चोडणकर यांनी केले.
याचबरोबर, ते म्हणाले की, सरकारमधील काही आमदार असंतुष्ट होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी कौल दिला. त्याविरोधात गेलेल्या सत्तेतील घटक पक्षांनाही हा धडा आहे. काँग्रेसने तळागाळात जाऊन भाजपाला उघडे पाडण्याची गरज आहे. मतदार दुखावलेले आहेत. या पुढील निवडणुकांमध्ये ते भाजपला धडा शिकवतील. लोकशाही नष्ट करण्याचे हे भाजपाचे कारस्थान जनताच उधळून लावील. भाजपाचे 'एक राष्ट्र, एक निवडणूक' हे तत्व नव्हतेच. त्यांचे तत्व 'एक राष्ट्र एक पक्ष', हेच असल्याची टीकाही चोडणकर यांनी शेवटी केली आहे.