गोव्याच्या पर्यटनाला ‘ओखी’ वादळाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 01:53 PM2017-12-04T13:53:26+5:302017-12-04T13:54:01+5:30

ओखी वादळाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. किना-यांवर पर्यटकांना पहुडण्यासाठी घातलेले पलंग वाहून गेल्याने तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने गेले दोन दिवस शॅक बंद आहेत.

'Okhi' storm hit Goa tourism | गोव्याच्या पर्यटनाला ‘ओखी’ वादळाचा फटका

गोव्याच्या पर्यटनाला ‘ओखी’ वादळाचा फटका

Next

पणजी : ओखी वादळाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. किना-यांवर पर्यटकांना पहुडण्यासाठी घातलेले पलंग वाहून गेल्याने तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने गेले दोन दिवस शॅक बंद आहेत. शॅक व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली आहे. 
राज्यात ठिकठिकाणच्या किना-यांवर मिळून सुमारे ३५0 हून अधिक शॅक आहेत. अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार शॅकमध्ये पाणी शिरल्यानंतर विदेशी पाहुणे हॉटेलमध्ये परतले ते काही पुन: आलेच नाहीत. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने गोव्यात मोठ्या संख्येने देश-विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात.


पर्यटन व्यावसायिकांना अर्थार्जनासाठी हाच कालावधी महत्त्वाचा असतो. किना-यांवरील शॅक हे पर्यटकांचे मोठे आकर्षण असते. शॅकमध्ये पाणी शिरल्याने स्थिती मोठे नुकसान झाले असून पाणी सध्या ओसरले तरी डागडुजी व इतर गोष्टींसाठी काही कालावधी लागेल. 
दक्षिण गोव्यातील मोबोर, उत्तर गोव्यातील मोरजी किना-याला सर्वाधिक झळ पोचली. शिवाय बागा, कळंगुट, हणजुण किना-यांवरील शॅकमध्येही पाणी शिरले. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कार्दोझ यांचा कळंगुटमध्ये शॅक असून समुद्राचे पाणी शॅकमध्ये शिरल्याने पलंग हटवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. 

पर्यटन खात्याने किना-यांवरील स्थितीवर नजर ठेवली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर मुंबईच्या दृष्टी लाइफ सेविंग कंपनीचे ६00 हून अधिक जीवरक्षक तैनात असतात. समुद्रात कोणी बुडत असल्यास त्या व्यक्तिला वाचविण्याचे काम हे जीवरक्षक करीत असतात. राज्यातील सर्व किनारे, धबधबे, मयें येथील तलाव आदी ठिकाणी जीवरक्षक तैनात केलेले आहेत. पर्यटकांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन दृष्टी लाइफ सेविंग कंपनीच्या अधिकाºयांनी केले आहे. पाळोळें किना-यावर रविवारी दोन आयरिश महिलांना बुडताना वाचविण्यात आले.
दरम्यान, पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार केळशी, मोबोर व मोरजी किना-याला जास्त फटका बसला आहे. वादळात नुकसान झाल्यास मामलेदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आढावा घेऊन नुकसान भरपाई ठरवितात. गेले तीन दिवस सुट्टी असल्याने पर्यटन खात्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. खात्याचे अधिकारी तसेच दृष्टी लाइफ सेविंगचे जीवरक्षक किना-यावर लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: 'Okhi' storm hit Goa tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.