पणजीत शुक्रवारी राज्य युवा संसद, मनोहर पर्रीकर यांच्याशी संवाद साधण्याची युवकांना मिळणार संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 09:14 PM2018-02-07T21:14:07+5:302018-02-07T21:14:17+5:30
विधिमंडळ खात्यातर्फे येत्या शुक्रवारी ९ रोजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात राज्य युवा संसद भरणार आहे. सभापती प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विधिमंडळ व्यवहारमंत्री फ्रान्सिस डिसोझा, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर उपस्थित राहतील. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संवाद साधण्याची संधी युवकांना मिळणार आहे.
पणजी : विधिमंडळ खात्यातर्फे येत्या शुक्रवारी ९ रोजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात राज्य युवा संसद भरणार आहे. सभापती प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. विधिमंडळ व्यवहारमंत्री फ्रान्सिस डिसोझा, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर उपस्थित राहतील. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी संवाद साधण्याची संधी युवकांना मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत सभापती सावंत यांनी या संसदेस महाविद्यालयीन व इतर मिळून एक हजार युवक, युवती उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या युवा आघाडीतील कार्यकर्त्यांनाही निमंत्रित केले आहे. राजकारणात येण्याआधी युवकांनी सामाजिक क्षेत्रात काम करावे. नेतृत्वगुण विकसित करावेत, असे सावंत म्हणाले.
‘अधिकारी योग्यरित्या काम करीत नाही’
युवा वर्गात आत्महत्त्येचे प्रमाण वाढले आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन होण्याची गरज आहे. त्यादृष्टीकोनातूनही चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. आमदार प्रसाद गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक व राजकीय विषयावर चर्चासत्र ठेवले आहे. सभापती म्हणाले की गोवा विधानसभेत ५0 टक्के आमदार तरुण आहेत. एका प्रश्नावर त्यांनी अशी खंत व्यक्त केली की, अधिकारीवर्ग योग्यरित्या काम करीत नसल्याने लोकांना क्षुल्लक तक्रारीही आमदारांकडे मांडाव्या लागतात.
गोव्याचा अर्थसंकल्प येत्या २२ रोजी
राज्याचा अर्थसंकल्प येत्या २२ रोजी मांडला जाईल. विधानसभा अधिवेशनासाठी ६८३ अतारांकित तर २८९ तारांकित प्रश्न आले आहेत. आतापर्यंत वेगवेगळे १२ खाजगी ठराव आलेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिनाभर विधानसभा अधिवेशन चालणार असले तरी प्रत्यक्ष कामकाज २२ दिवसच होणार आहे. पुतळ्याच्या विषयावर विधानसभा गाजणार आहे. उपसभापती मायकल डिसोझा यांनी डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारावा, अशी मागणी करणारा ठराव सादर केला आहे तर भाजपचे अन्य आमदार राजेश पाटणेकर यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जावा, अशा मागणीचा ठराव सादर केला आहे. मगोपतर्फे डॉ. राम मनोहर लोहिया तसेच टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभारावेत, अशा आशयाच्या मागणीचा ठराव सादर केला जाईल.