पॅराग्लायडिंग बेतले जीवावर
By admin | Published: May 25, 2016 02:47 AM2016-05-25T02:47:43+5:302016-05-25T02:50:25+5:30
मडगाव : कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करत असताना खाली कोसळून समुद्रात वाहून गेल्यामुळे खडकरपूर-कोलकाता
मडगाव : कोलवा समुद्रकिनाऱ्यावर पॅराग्लायडिंग करत असताना खाली कोसळून समुद्रात वाहून गेल्यामुळे खडकरपूर-कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील शशी शेखर प्रसाद (वय ४९) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. शशी शेखर हा पॅराग्लायडिंग करत असताना त्याने घातलेले सुरक्षा जॅकेट पॅराशूटपासून सुटल्यामुळे तो खाली पाण्यात कोसळला व समुद्राच्या लाटांबरोबर समुद्रात ओढला गेला. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रथम एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. त्याची स्थिती पाहून त्याला खासगी इस्पितळातून मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
शशी शेखर प्रसाद कोलकाता येथील फेडरल ब्रँडिंग कंपनीत उच्च पदावर काम करत होता. त्याच्या कंपनीतील इतर काही अधिकारी परिवारासह गोव्यात एका अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले होते. हे सर्वजण उतोर्डा येथील एका तारांकित हॉटेलात उतरले होते. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शशी शेखर आपल्या पत्नीसह गोवा दर्शनसाठी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर आला होता. पॅराग्लायडिंग पाहून त्याला मोह आवरला नाही. जीवनात प्रथमच अनुभव घेत असलेला हा साहसी खेळ अंतिम खेळ ठरला. पॅराग्लायडिंग करणाऱ्या बोटमालकांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पतीला प्राण गमावावे लागल्याचा आरोप शशी याच्या पत्नीने केला आहे. शशी शेखर हा प्रकृतीने स्थूल असल्यामुळे त्याला ते जॅकेट होत नव्हते. असे असतानाही त्याच स्थितीत त्याला जॅकेट घालून पॅराशूटवर चढवले, असा आरोप त्याच्या पत्नीने केला. (प्रतिनिधी)