गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 07:46 PM2018-01-04T19:46:43+5:302018-01-04T19:48:56+5:30
पणजी- गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास आता दंड ठोठावला जाणार आहे.
- सदगुरू पाटील
पणजी- गोव्यात उघड्यावर पर्यटक किंवा इतर कुणीही दारू पिणे हा आतापर्यंत दखलपात्र गुन्हा नव्हता, पण येत्या महिन्यापासून हा दखलपात्र गुन्हा होईल व कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाईही होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.
मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारने अबकारी कायद्यात यापूर्वीच दुरुस्ती केली आहे, पण ती दुरुस्ती अधिसूचित केली नव्हती. आता लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. त्यासाठीचा मसुदा तयार होत आहे. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या आरंभी ही तरतुद लागू होईल व सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रस होईल अशा प्रकारे उघड्यावर दारू पिणे हा दखलपात्र गुन्हा ठरेल.
मुख्यमंत्री म्हणाले, की विवाह सोहळा किंवा अन्य एखाद्या सोहळ्याप्रसंगी जर कुणी उघडय़ावर मद्य पित असेल तर तिथे कारवाई केली जाणार नाही. कारण अशा सोहळ्यांना परवानगी असते पण अन्यबाबतीत मात्र कारवाई होईल. पर्यटक आणि अन्य घटकांनी त्यासाठी सरकारला सहकार्य करावे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये वगैरे बसून पर्यटकांनी मद्य प्यावे, पण उघड्यावर दारू पिण्याचे कृत्य करू नये. अबकारी कायद्यातील नव्या तरतुदीचे पालन करावे एवढी पर्यटकांकडून सरकारची अपेक्षा आहे. दारूच्या बाटल्या कुठेही फेकून देणे किंवा अन्य कचरा रस्त्याच्या बाजूने टाकताना कुणी पर्यटक किंवा स्थानिक आढळले तर लगेच कारवाई केली जाईल. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल.
दरम्यान, गोव्यात प्लॅस्टिक बंदीही येत्या 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. रस्त्याच्या कडेला जर ट्रकांमधून आणून कुणीही कचरा टाकला तर तो ट्रक सरकारी यंत्रणा जप्त करील. महामार्गाच्या बाजूने आणून टाकला गेलेला कचरा गेल्या काही महिन्यांत सरकारी यंत्रणांनी गोळा केला. चार हजार दोनशे टन कचरा अशा प्रकारे गोळा झाला आहे. जर हा कचरा उचलला गेला नसता व असाच महामार्गाच्या बाजूने ठेवला गेला असता तर पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असती, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्लॅस्टिक वापर बंदीचा पहिला टप्पा 26 जानेवारीला सुरू होईल. 30 मे पासून गोव्यात पूर्णपणो प्लॅस्टिक बंदी असेल. पीव्हीसीआधारित प्लॅस्टिकला आम्ही बंदी लागू करू. स्टार्च आधारित प्लॅस्टीकला प्रोत्साहन देऊ. प्लॅस्टीकमधून खाण्याचे आणि अन्य खाद्य पदार्थ पॅक करून देण्यावरही बंदी लागू केली जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.