गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांविरुद्धची अपात्रता याचिका फेटाळली, काँग्रेस पक्षाने दाखल केली होती याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 11:40 AM2017-10-11T11:40:42+5:302017-10-11T11:41:47+5:30
विश्वजित राणे यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाकडून दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली.
पणजी - गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्षाकडून दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने बुधवारी फेटाळली. राणे हे मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसमधून निवडून आले होते. परंतु कॉंग्रेसला सर्वाधिक 17 जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यास अपयश आल्यामुळे भाजपने इतर पक्षांच्या व अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले.
या सरकारात सामील होण्यासाठी राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला होता. त्यांना आरोग्यमंत्री बनविण्यात आल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या वाळपई मतदारसंघातून निवडून आले.
दरम्यान ज्या दिवशी विश्वजित राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा तत्कालीन सभापतींना सादर केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनी राणे यांच्या विरुद्ध पक्षांतर्गत बंधी कायद्याचा आधार घेत त्यांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका खंडपीठात सादर केली होती.