गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये परप्रांतीयांना आजपासून शुल्क लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 12:45 IST2018-01-01T12:43:06+5:302018-01-01T12:45:46+5:30
परप्रांतीय रुग्णांना गोमेकॉ तसेच राज्यातील अन्य तीन मिळून एकूण चार सरकारी इस्पितळांमध्ये वैद्यकीय उपचार, शस्रक्रिया तसेच रक्तचाचण्या व इतर चाचण्यांसाठी आजपासून शुल्क लागू झाले आहे.

गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये परप्रांतीयांना आजपासून शुल्क लागू
पणजी : परप्रांतीय रुग्णांना गोमेकॉ तसेच राज्यातील अन्य तीन मिळून एकूण चार सरकारी इस्पितळांमध्ये वैद्यकीय उपचार, शस्रक्रिया तसेच रक्तचाचण्या व इतर चाचण्यांसाठी आजपासून शुल्क लागू झाले आहे. गोमंतकीय रुग्णांना दीनदयाळ आरोग्य विमा योजनेंतर्गत देण्यात आलेले कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. शुल्क आकारणीसाठी गोमेकॉत दोन अतिरिक्त कक्ष उघडण्यात आले आहेत. दीनदयाळ आरोग्य विमा कार्ड नसलेल्या गोंमतकीय रुग्णांनी मोफत उपचारांसाठी अन्य ओळखपत्र सादर करावे लागेल.
गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार बाह्य रुग्ण विभागाचे पाच कक्ष तसेच अतिरिक्त दोन मिळून एकूण सात कक्षांवर शुल्क आकारणीची प्रक्रिया होईल त्यासाठी अतिरिक्त कर्मचारीही नेमले आहेत. सकाळपासून सर्व प्रक्रिया सुरळीतपणे चालू असल्याचा दावा त्यांनी केला.
शेजारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कर्नाटकातील कारवार, कुमठा भागातून वैद्यकीय उपचारांसाठी येथे येतात. परप्रांतीय रुग्णांवर आजपासून मोफत उपचार बंद झालेले असल्याने या परप्रांतीय रुग्णांना आता पैसे मोजावे लागतील. गरीब आणि आणीबाणीच्या प्रसंगी एखाद्या वैद्यकीय उपचारासाठी परप्रांतीयांना मोफत सेवा दिली जाईल परंतु त्याबाबत सर्वस्वी निर्णय आरोग्य खात्याचे संचालक तसेच गोमेकॉचे अधीक्षकच घेतील. फक्त गोमंतकीयांनाच उपचार मोफत मिळणार असून त्यासाठी दयानंद स्वास्थ विमा योजनेंतर्गत देण्यात आलेले कार्ड सरकारी इस्पितळांमध्ये सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ (गोमेकॉ) तसेच म्हापशाचे जिल्हा इस्पितळ, मडगांवचे आॅस्पिसियो इस्पितळ आणि फोंडा येथील सरकारी इस्पितळांमध्येही हे शुल्क लागू झाले आहे. दीनदयाळ आरोग्य विमा योजनेंतर्गत ‘क ’ श्रेणीत येणाºया इस्पितळांमध्ये आकारल्या जाणा-या शुल्काच्या २0 टक्के इतके शुल्क आकारले जात आहे. पहिल्या टप्प्यात १८१ प्रकारच्या आजारांवरील शस्रक्रिया रक्तचाचण्या व इतर चाचण्यांसाठी शुल्क लागू असेल.
रक्त चांचण्या, अल्ट्रासाउंड, एक्स रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदींसाठी तसेच वेगवेगळ्या शस्रक्रियांसाठी शुल्क आकारणी सुरु झाली असून खाटेसाठी दिवशी ५0 रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहे. या योजनेचा तीन महिने पाहणी केल्यानंतर फेरआढावा घेतला जाईल.