मासे आणि मांस कचऱ्यापासून गोव्यात सुगंधी खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:36 AM2018-01-05T11:36:19+5:302018-01-05T11:37:43+5:30

पणजी - मासे कापल्यानंतर शिल्लक राहणारा कचरा आणि मांसाचे तुकडे केल्यानंतर बाकी राहणारा कचरा गोळा करून त्यापासून सेंद्रीय खत निर्मिती केली जाते असे कुणाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही.

 Production of aromatic fertilizers from fish and meat wastes | मासे आणि मांस कचऱ्यापासून गोव्यात सुगंधी खत निर्मिती

मासे आणि मांस कचऱ्यापासून गोव्यात सुगंधी खत निर्मिती

googlenewsNext

- सदगुरू पाटील

पणजी - मासे कापल्यानंतर शिल्लक राहणारा कचरा आणि मांसाचे तुकडे केल्यानंतर बाकी राहणारा कचरा गोळा करून त्यापासून सेंद्रीय खत निर्मिती केली जाते असे कुणाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही. मात्र गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत हे घडण्यास आरंभ झाला आहे. मांस व माशांच्या कचऱ्यात पाल्यापाचोळ्याचे मिश्रण करून पणजीत खत निर्मिती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या खताचा कोणतीच दरुगधी येत नाही. उलट कुणीही नाकाकडे नेऊन या खताचा वास घ्यावा एवढी उत्तम निर्मिती होत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या खताची स्तुती केली.

मांसाहारी कचऱ्यापासून काळेशार सेंद्रीय खत निर्माण करण्याची किमया साधली आहे, पणजीतील नव्या प्रक्रिया प्रकल्पाने. पणजी बस स्थानकाकडे असलेल्या हिरा पेट्रोल पंपच्या मागिल जागेत 1 हजार 30 चौरस मीटर क्षेत्रफळात हा प्रकल्प उभा राहिला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतरांनी गुरुवारी या प्रकल्पाची पाहणी केली व उद्घाटनही झाले. याच प्रकल्पातील काळेशार खत वापरून प्रकल्प परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. खत एवढे चांगले आहे, की ही झाडे खूप चांगली वाढतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 

कचरा जातो तीन ठिकाणी 
पणजीत घरोघर जो कचरा तयार होतो, तो कचरा नेमका कुठे जातो हे अनेकांना ठाऊक नसते. पणजीची मतदारसंख्या सुमारे बावीस हजार आहे. पंचेचाळीस हजार लोकसंख्या आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, हॉटेलमधील कॅसिनो, दुकाने, मॉल, विविध गॅलरीज, शेकडो छोटे धंदे आणि व्यापाराची गर्दी पणजीत आहे. शिवाय सरकारी आणि अन्य वसाहती व सगळीच महत्त्वाची सरकारी कार्यालये राजधानीतच. मासळी मार्केट आणि स्वतंत्र पालिका बाजारपेठ. या सगळीकडे मिळून रोज बारा टन कचरा पणजीत निर्माण होतो. या बारा टनांपैकी विशिष्ट रोज सहा टन कचरा पणजीतील ह्या नव्या प्रकल्पात जातो, जिथे कच:यापासून मऊशार खताची निर्मिती होते. पणजीतील कुठच्या कचऱ्याने कुठच्या भागात जावे याविषयी जणू कचऱ्यावर पत्ता लिहिल्यासारखे ठरून गेले आहे. एकूण तीन ठिकाणी पणजीतील कचरा जातो.

मांसाहारी कचरा येतो इथे 
पणजीतील घरांमध्ये रोज दुपारी महापालिकेचे कामगार येतात व ओला कचरा गोळा करतात. आठवडय़ाचे दोन दिवस ते सुका कचराही घेऊन जातात. 
घरांमधील कचरा हा प्रामुख्याने ईडीसी पाटो येथे एलआयसी इमारत परिसरात असलेल्या जागेतील प्रकल्पात जातो. पणजी मार्केटमध्ये कचरा प्रक्रियेची व्यवस्था आहे. मासे व मांस कापण्याची व्यवस्था बाजारात आहे. बाजारात तयार होणारा कचरा हा बाजारातील प्रकल्पात काही प्रमाणात जातो. मासाहारी कचरा बाजारासह पणजीत अन्य ठिकाणीही निर्माण होतो, तेथील बराच मांसाहारी कचरा आणि पालापाचोळा थेट पणजीत गुरुवारी उद्घाटन झालेल्या प्रकल्पात येतो. तिथे सेंद्रीय खताची निर्मिती केली जाते. या प्रकल्पात फिरताना जास्त दुर्गंधी येत नाही. खताला तर कोणताच वाईट वास येत नाही. त्यामुळे कुणीही ते हातात घेऊन खुशाल झाडासाठी वापरता येते.

16 रुपये किलो खत 
नव्या प्रकल्पात निर्माण होणारे खत सध्या विकले जात नाही पण विकायला गेल्यास बाजारात या खताची किंमत प्रती किलो सोळा रुपये आहे, असे गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असलेले सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांनी सांगितले. या प्रकल्पात रोज सहा टन कचरा आल्यानंतर त्यातील पाच टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया होत असते. सध्या प्रकल्पाची क्षमता कमी असली तरी, भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे क्षमता पंधरा ते वीस टनांर्पयत वाढविण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांसाठी शौचालय व्यवस्था, ट्रक क्लिनिंग बे, वजन माप सुविधा या शिवाय कपडे बदलण्यासाठी जागा, कार्यालय अशा सुविधा आहेत. 
 

Web Title:  Production of aromatic fertilizers from fish and meat wastes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.