'अ'स्वच्छ भारत अभियान : गोव्यात रस्त्याकडील कच-याच्या ढिगा-यामुळे पर्यटक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 01:04 PM2018-01-06T13:04:46+5:302018-01-06T13:08:28+5:30
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्यातील अनेक रस्त्यांच्या बाजूला अजुनही मोठ्या प्रमाणात पडलेला कचरा पाहून पर्यटकांच्या मनात गोव्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे.
पणजी - स्वच्छ भारत, स्वच्छ गोवा अभियान सरकार एकाबाजूने राबवत आहे व त्याचे चांगले परिणाम दिसूनही येत आहेत. मात्र दुस-या बाजूने राष्ट्रीय महामार्ग, रस्त्याच्या बाजूला आणि नाले, नद्या व टेकड्यांवर आणून कच-याचे ढिग गोव्यातील बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांसह काही लोकंही टाकत असल्यामुळे अनेक महत्त्वाचे भाग हे बकाल झालेले आहेत.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्यातील अनेक रस्त्यांच्या बाजूला अजुनही मोठ्या प्रमाणात पडलेला कचरा पाहून पर्यटकांच्या मनात गोव्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. पर्यटक काहीवेळा भरून ओतणा-या कच-या कुंड्या पाहूनही कंटाळू लागले आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मते सरकारी यंत्रणा सध्या गोव्यातील महामार्गाच्या बाजूने असलेला प्लास्टिक आणि अन्य सर्व प्रकारचा कचरा उचलण्याचे काम करत आहे. वर्षाला एकूण 600 टन कचरा हा रस्त्यांच्या बाजूने पडलेला सरकारी यंत्रणोने गोळा केला आहे. अशा प्रकारे गेल्या काही वर्षात एकूण 4 हजार 20 टन कचरा महामार्गाच्या बाजूला सापडल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
जर हा कचरा उचलला गेला नसता तर गोव्याची प्रतिमा पर्यटकांच्या मनात खूप खराब झाली असती असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र गोव्यातील अंतर्गत भाग, किनारपट्टी, गावांमधील रस्त्यांच्या बाजूची स्थिती ही अजूनही बकाल आहे. तिथे अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा समाजाच्या विविध घटकांकडून आणून टाकला जात आहे.
गोवा विधानसभेत उपसभापती असलेले मायकल लोबो यांनी जाहिरपणे सांगितले की, सध्या अनेक रेस्टॉरंट तसेच हॉटेल व्यावसायिक आणि अन्य लोकही प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्यांमुळे कचरा भरतात व हा कचरा झाडींमध्ये आणि डोंगरांवर नेऊन टाकतात. यामुळे डोंगरांवर कच-याचे ढिग निर्माण झाले आहेत. लोबो यांनी शिवोली-अंजुणाच्या पट्ट्यातील एका डोंगराचेही उदाहरण दिले. रस्त्यावरून कुणीही वाहनात बसून जाताना तेथील डोंगर पाहवतदेखील नाहीत, असे लोबो म्हणाले व कचरा कुठेही टाकणा-यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी, असे मत लोबो यांनी व्यक्त केले आहे.
पेडणो, बार्देश, तिसवाडी व सासष्टी या चार तालुक्यांमध्ये गोव्यातील अनेक जगप्रसिद्ध किनारे व किनारी भाग येतात. उफाळलेला समुद्र पर्यटकांना भुरळ पाडतो. मात्र या तालुक्यांमधील अनेक रस्त्यांच्या बाजूला, मैदाने, बाजारपेठा, टेकड्य, रस्त्यांच्या बाजूला असणा:या द:या अशा ठिकाणी कच-याचे साम्राज्य दिसून येत आहे. काहीवेळा भरलेल्या कचरा कुंडय़ांच्या बाजूला भटके कुत्रे व गुरे यांची प्रचंड गर्दी दिसून येते.