गोव्याच्या समुद्र किना-यावरील दुर्घटना रोखण्यासाठी स्थापन केलेली समिती नावापुरतीच, महिन्याभरात एकही बैठक झाली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 02:03 PM2017-10-22T14:03:15+5:302017-10-22T14:05:12+5:30
गोव्यातील किना-यांवर पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करुन महिना उलटला तरी या समितीची अजून एकही बैठक होऊ शकलेली नाही.
पणजी - गोव्यातील किना-यांवर पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करुन महिना उलटला तरी या समितीची अजून एकही बैठक होऊ शकलेली नाही. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात गोव्यातील वेगवेगळ्या किना-यांवर सहा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यानंतर तातडीची बैठक घेऊन समिती स्थापन केली होती.
किना-यांवरील दुर्घटना नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल हे सूचविण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली होती. या प्रकरणात त्वरित अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते तोदेखिल सादर झालेला नाही. पर्यटक संचालक मिनीन डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, समितीची बैठक झालेली नसली तरी किना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. या समितीकडून अतिरिक्त उपाययोजना सूचविल्या गेल्यास त्या विनाविलंब अंमलात आणल्या जातील.
सप्टेंबरच्या घटनांमध्ये असे आढळून आले होते की, रात्री अंधारात पर्यटक समुद्रात स्थानासाठी उतरले होते. दोघे पर्यटक तर नशेत होते. किनाºयांवर मद्यपान व नशाबाजी करुन समुद्रात उतरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीचे जीवरक्षक किना-यांवर तैनात असतात ते वेळोवेळी धोक्याचा इशाराही देत असतात. सुर्यास्ताच्यावेळी जीपगाडी किनाºयांवर फिरते आणि जीवरक्षक कर्णे लावून मोठ्याने पर्यटकांना समुद्रस्नानास मनाई करीत असतात परंतु ही जीपगाडी वळली की पुन: पर्यटक समुद्रात उतरतात. मान्सून काळात समुद्रस्नानासाठी उतरण्यास मनाई आहे.
एका जीवरक्षकाने सांगितले की, मद्यप्राशन केल्यानंतर पर्यटक कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. ते कोणालाही जुमानत नाहीत आणि हट्टाने समुद्रात उतरतात. विस्तीर्ण किना-यावर जीवरक्षकांचा डोळा चुकवून समुद्रात उतरतात. दरम्यान, किना-यांवर मद्यप्राशन करुन अंदाधुंदी करणाºया तसेच धोक्याचा इशारा देऊनही समुद्रात उतरणा-या पर्यटकांवर कारवाईसाठी कायदा करणे शक्य आहे का याची चाचपणी पर्यटनमंत्र्यांनी सुरु केली आहे. शॅकमध्ये यापुढे बीयर तसेच अन्य मद्यासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर करु नये, काचेचे ग्लास वापरु नयेत अशी अट नव्या मोसमासाठी शॅकवांटप करताना घालण्यात आलेली आहे. शॅक व्यवसाय सध्य जोमात सुरु आहे परंतु या अटीची अंमलबजावणीही अभावानेच झालेली दिसत आहे.
गोव्यात दृष्टी लाइफ सेविंग प्रा, लि, ही मुंबईची कंपनी जीवरक्षक पुरविण्याचे काम करते. कांदोळी, कळंगुट, बागा, हणजुण, वागातोर, हरमल, कोलवा, बेतालभाटी आदी किनाºयांवर तसेच आता धबधब्यांवरही जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. सुमारे ६00 जीवरक्षक ही सेवा बजावतात.
पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी कंपनीचे अधिकारी, किनारी पोलिस, आयआरबी जवान तसेच पर्यटन खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक गेल्या महिन्यात घेतली. या दुर्घटना कशा काय घडल्या याची माहिती करुन घेतली आणि सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्यास बजावण्यात आलेले आहे. किना-यांवर दारु पिऊन धिंगाणा घालणा-या पर्यटकांच्या अंदाधुंदीला आळा घालण्यासाठी कायदा करता येईल का याचा अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले गेले आहेत.