वागातोरला 28 डिसेंबरपासून टाईमआऊटचा ईडीएम होणार, लाईफ मीडियाची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 07:45 PM2017-11-30T19:45:17+5:302017-11-30T19:53:58+5:30
पर्यटकांचे केंद्र मानल्या जाणा-या उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील वागातोर येथे दि. 28 डिसेंबरपासून इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव (ईडीएम) होणार आहे. टाईमआऊट 72 या कंपनीला हा ईडीएम आयोजित करण्याची संधी मिळेल.
पणजी : पर्यटकांचे केंद्र मानल्या जाणा-या उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील वागातोर येथे दि. 28 डिसेंबरपासून इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव (ईडीएम) होणार आहे. टाईमआऊट 72 या कंपनीला हा ईडीएम आयोजित करण्याची संधी मिळेल. कारण लाईफटाईम मीडिया या कंपनीने आपला अर्ज मागे घेतला आहे. ईडीएम हा गोव्याच्या किनारपट्टीतील सर्वात मोठा सोहळा मानला जात आहे.
लाईफटाईमलाही वागातोरपासून जवळच असलेल्या कांदोळी येथे ईडीएम आयोजित करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्या कंपनीने अर्ज केला होता. तथापि, ईडीएमच्या आयोजनापूर्वी विविध प्रकारची प्रक्रिया पार पाडावी लागते. ती प्रक्रिया लाईफटाईम मीडियाने पार पाडली नाही. शिवाय स्वत:हून अर्ज मागे घेतला. कांदोळी येथे छोटय़ा स्वरुपात म्हणजे सुमारे चार-पाच हजार प्रेक्षक जमतील एवढा ईडीएम ही कंपनी आयोजित करू पाहत होती. दोन्ही ईडीएम एकाचवेळी म्हणजे डिसेंबरच्या अखेरीस आयोजित केले जाऊ नयेत, असे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीचे म्हणणे होते. दोन्ही सोहळे एकाचवेळी आयोजित केले गेल्यास पर्यटन केंद्र असलेल्या किनारपट्टीत वाहतुकीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर ताण येतो. आता टाईमआऊट या एकाच कंपनीचा अर्ज राहिला आहे. ही कंपनी येत्या दि. 27 पासून ईडीएम आयोजित करील. त्यासाठी अगोदर वीज, अग्निशामक, वाहतूक, पोलीस आदी विविध खात्यांचे ना हरकत दाखले प्राप्त करण्यास टाईमआऊट कंपनीला समितीने सांगितले आहे. येत्या दि. 10 डिसेंबरपर्यंत सरकारी समिती आपला अंतिम निर्णय घेईल. हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा एक ईडीएम डिसेंबरमध्ये व्हायला हवा या मताचे सरकार आहे. सरकारने त्यामुळे ईडीएमला तत्त्वत: मान्यता दिलेली आहे, असे सुत्रांनी सांगितले.
मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक गुरुवारी पार पडली. आतापर्यंत टाईमआऊट 72 कंपनीने प्रक्रिया किती पुढे नेली आहे, कुठच्या यंत्रणोकडून ना हरकत दाखला मिळविला आहे या सगळ्य़ाचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे, एका सदस्याने सांगितले. सन बर्नने यंदा गोव्यात ईडीएम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. ईडीएमवेळी हजारो पर्यटक अखंडीतपणो मोठय़ा संगीताच्या तालावर नृत्य करत असतात.
दरम्यान, गोव्यात मिरामार किनारपट्टीच्या क्षेत्रात दि. 15 ते 22 डिसेंबरपर्यंत सेरेंडिपीटी आर्ट महोत्सव होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने या महोत्सवाच्या आयोजनाला मान्यता दिली आहे, असे सुत्रांनी सांगितले.