१.८२ लाखाची लाच घेणाऱ्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम सभापतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल
By नरेश रहिले | Published: May 14, 2024 08:01 PM2024-05-14T20:01:16+5:302024-05-14T20:02:07+5:30
सडक-अर्जुनीच्या नगर परिषदेत कारवाई: नाली बांधकामाच्या कार्यारंभ आदेशासाठी मागितली होती १५ टक्के रक्कम
गोंदिया : बांधकाम करण्याचे कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच लाच मागण्याचे प्रमाण गोंंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. काम देण्याच्या नावावर लोकप्रतिनिधी मोठी रक्कम स्विकारत असल्याचा प्रकार सुरू झाला आहे. असाच एक प्रकार १४ मे रोजी सडक-अर्जुनी येथील नगर पंचायतमध्ये घडला. नाली बांधकाम करण्यासाठी १५ टक्के देण्याची मागणी करणाऱ्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम सभापती, नगरसेवक व नगरसेविकेचा पती व एक व्यापारी अश्या सहा जणांचा १ लाख ८२ हजाराची लाच घेतल्यामुळे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १३ मे रोजी गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील ५६ वर्षाच्या व्यक्तीच्या मुलाने सडक-अर्जुनी येथे नाली बांधकामाचे कंत्राट घेतले होते. नगर पंचायत सडक-अर्जुनी अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान सन २०२३-२४ लेखाशिर्ष (२२१७ १३०१) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्या होत्या तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली होती. कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदाराने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली. त्यावेळी नगराध्यक्ष यांनी निविदा रकमेच्या १५% रक्कम लाच मागणी केली असल्याची तक्रार केली होती.
लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता मुख्याधिकारी यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी नगराध्यक्ष तेजराम किसन मडावी यांची भेट घेण्यास सांगितले. तक्रारदार यांनी नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता त्यांनी १२ लाख १५ हजार ६३४ रूपयाच्या निविदेसाठी १५ टक्के प्रमाणे १ लाख ८२ हजार रूपये लाचेची मागणी केली. तर आरोपींनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांनी गोंदियाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नगराध्यक्ष मडावी यांनी १ लाख ८२ हजार रूपये सडक-अर्जुनीच्या शुभम रामकृष्ण येरणे (२७) याच्याकडे देण्यास सांगितले. त्याने ती रक्कम देखील स्विकारली आहे.
या सहा जणांवर गुन्हा
लाच मागणाऱ्या सहा आरोपीत मुख्य आरोपी नगर पंचायत, सडक अर्जुनीचा नगराध्यक्ष तेजराम किसन मडावी (६६) रा. सडक अर्जुनी, प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे (५६) रा. सेंदुर वाफा,ता.साकोली जि. भंडारा, नगर पंचायत, सडक अर्जुनीचा बांधकाम सभापती अश्लेश मनोहर अंबादे (३५) रा. सडक-अर्जुनी, नगरसेवक महेंद्र जयपाल वंजारी (३४) रा. सडक अर्जुनी, नगरसेविकेचा पती जुबेर अलीम शेख राजू शेख रा. रा. प्रभाग क्रमांक ४ सडक अर्जुनी, खाजगी व्यक्ती शुभम रामकृष्ण येरणे (२७) रा.सडक-अर्जुनी या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, महिला नायक पोलीस शिपाई संगीता पटले ,चालक नायक पोलीस शिपाई दिपक बाटबर्वे यांनी केली आहे.
तक्रार कारायची आहे; संपर्क साधा
गोंदिया जिल्ह्यातील नागरीकांना कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ टोल फ्रि क्रंमांक १०६४ वर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.