अर्जुनीतही सजली ‘माणुसकीची भिंत’
By admin | Published: June 23, 2017 01:14 AM2017-06-23T01:14:19+5:302017-06-23T01:14:19+5:30
प्रत्यक्ष केलेले दान हे उपकार तर अप्रत्यक्ष दान हे औदार्य व माणुसकीचे प्रतीक आहे. कुणाला नवीन वस्तूंचे मोल नसते तर कुणाला जुन्या वस्तूंचे आकर्षण असते.
‘नको असेल ते द्या...: हवे असेल ते घेऊन जा’
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : प्रत्यक्ष केलेले दान हे उपकार तर अप्रत्यक्ष दान हे औदार्य व माणुसकीचे प्रतीक आहे. कुणाला नवीन वस्तूंचे मोल नसते तर कुणाला जुन्या वस्तूंचे आकर्षण असते. समाजाची रचना आगळीवेगळीच आहे. अलीकडे ‘नको असेल ते द्या... हवे असेल ते घेवून जा...’ अशा साध्या सूत्रावर आधारलेली ‘माणुसकीची भिंत’ नावाची नवी चळवळ शहरी व ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. अशा संवेदनशील समाजमनामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला ‘माणूस’ या माणुसकीच्या भिंतीत दिसून येतो.
माणुसकीच्या भिंतीत कोणी तरी मागण्यासाठी येतो अन् कोणीतरी देण्यासाठी. दाता कोण आहे ते याचकाला माहिती नाही. आपण देतो ते कुणाला देतो ते दात्यालाही माहिती नसल्याने दातृत्वाचा अहंकार नाही. अन् याचक असला तरी त्याच्या चेहऱ्यावर आर्जव नाही. हे फार सुंदर चित्र आहे. अशीच एक ‘माणुसकीची भिंत’ येथील बसस्थानक परिसरात दिसून येते.
एरव्ही ज्या भिंतीवर मोर्चा, निदर्शने किंवा उत्पादक कंपन्यांच्या जाहिराती दिसायच्या ते चित्र आता पालटले आहे. ही माणुसकीची भिंत आहे तरी कशाची? तर बसस्थानकाच्या दर्शनी आवारभिंतीला हँगर व खिळे ठोकून जुनेच परंतु स्वच्छ धुतलेले कपडे, चादर, ब्लेंकेट व अन्य वस्तू अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांच्या पँटशर्टपर्यंत लटकून आहेत. याचक हा आपल्या मापाचे व आवडीचे कपडे निवडून घरी आनंदाने घेवून जातो.
दाता कोण आहे त्याला माहिती नाही. पण माझीही काळजी घेणारे समाजात कुणीतरी आहेत. या आशावादाने तो मनोमन सुखावतो. हे सारे चित्र ज्या भिंतीमुळे समोर येते ती भिंत केवळ दगड मातीची कशी राहू शकते. ज्या भिंतीने जातीपातीचीही अडसर जमीनदोस्त केली ती दगड- मातीची राहिलीच नाही.
ती केवळ अन् केवळ ‘ माणुसकीचीच भिंत’ आहे. माणुसकीच्या या भिंतीमुळे अनेक कुटुंबांच्या घरी चिल्यापिल्यांच्या आनंदातच भर पडते. एक प्रकारे ‘एकमेका साह्य करु.. अवघे धरु सुपंथ’ असाच हा ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम आहे.