‘भक्त प्रल्हाद’ नाटकातून कलावंतानी पाडली कलेची छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:52 PM2018-02-14T21:52:33+5:302018-02-14T21:52:48+5:30
आज सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसून येत आहे. माणूस हा छंदप्रिय आहे. आपली जबाबदारी इमाने ईतबारे सांभाळूनही आपला छंद जोपासण्यास कोणतीही उणिव भासू देत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : आज सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसून येत आहे. माणूस हा छंदप्रिय आहे. आपली जबाबदारी इमाने ईतबारे सांभाळूनही आपला छंद जोपासण्यास कोणतीही उणिव भासू देत नाही. समाजाचा पांठीबा सोबतीला असल्याने ताडगाव येथील हौसी महिला कलाकार आज पुढे येवून आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना रिझवून सोडतात. ताडगावच्या महिला नाट्य कलाकारांनी ‘भक्त प्रल्हाद’ या पौराणिक नाटकाचा नुकताच प्रयोग सादर केला.
अशोक चांडक यांच्या आवारात सदर नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे व जि.प.सदस्य मंदा कुंभरे यांच्या उपस्थितीत इंजिनिअर आनंदकुमार जांभुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ताडगावच्या हौशी कलाकार महिला सिंहाचा छावा, सैतानी पाश, सोन्याची द्वारका, स्वर्गावर स्वारी या ऐतिहासीक नाटकाच्या प्रयोगातही अभिनयाची साथ करुन नाट्य प्रयोग सादर केले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ताडगाव हे गाव नाटकाचे केंद्र समजले जाते. गावात नाट्य कलाकारांची खाण आहे. वर्षातून कित्येकदा नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. विशेष म्हणजे महिला नाट्य कलाकारांची देण गावाला लाभली आहे. आज महिलांना नाटकामध्ये काम करताना समाज व कुटूंबाचा विरोध काही वेळा जाणवतो.
परंतु ताडगाव येथे तशी मानसिकता दिसून नयेत नाही. उलट महिलांनी आपल्या अभिनयाची अप्रतिम छाप समाजापुढे पाडावी या हेतूने घरचा माणूस सुद्धा पत्नीला पाठींबा देऊन प्रोत्साहित करतो. यामुळे येथील महिला नाट्य कलाकार नाटकाचे सादर करणासाठी बाहेरगावी जावून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
नाटकाचे सादरीकरण करण्यासाठी माणिक नाकाडे, अरविंद नाकाडे, सुनील नाकाडे यांची साथ मिळत आहे. झाडीपट्टीतील महिला आज नाट्यभूमीत शहरी कलावंतांच्या मागे नाही हे ताडगावच्या महिला नाट्यकलाकारांनी दाखवून दिले.