उमेदवारांचा थेट संर्पकावर भर : सोशल मीडियातून हायटेक प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:47 PM2017-12-11T22:47:54+5:302017-12-11T22:48:09+5:30
येथील नगर पंचायत निवडणुकीकरिता मागील दहा दिवसांपासून जोरात प्रचार सुरू होता.
आॅनलाईन लोकमत
सालेकसा : येथील नगर पंचायत निवडणुकीकरिता मागील दहा दिवसांपासून जोरात प्रचार सुरू होता. निवडणुकीच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार करण्यावर बंदी आहे. त्यामुळे सालेकसा येथे सोमवारी (दि.११) प्रचारतोफा थंडावल्याचे चित्र होते.
नगर पंचायत निवडणूक प्रचारासाठी लाऊड स्पीकरवरून प्रचार सुरू होता. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी (दि.११) जाहीर प्रचार बंद करण्यात आला. मताचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार आपल्या कुटूंब आणि मित्र मंडळीसह मतदारांच्या घराचे दार ठोठावू लागले आहेत. त्याच बरोबर उमेदवार आणि त्याचे निकटवर्तीय स्मार्ट फोनचा वापर करीत व्हॉट्सअप, मॅसेज व सरळ मोबाईलवर कॉल करुन मतदारांचे मत वळविण्याचा प्रयत्न सुरू केला. तर काही उमेदवार प्रत्यक्ष गृहभेटी देण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक उमेदवाराची मोठी दमछाक पण होत आहे. जवळपास १० किमीच्या परिसरात पाच सहा गावात वसलेली नगर पंचायत सालेकसामध्ये फक्त दोन तीन प्रभाग शहरीकरण झाल्यासारखे आहे. इतर प्रभाग पूर्णपणे ग्रामीण जंगल भागाला लागून व मागासलेल्या आदिवासी लोकांच्या वस्तीत आहेत.
गावात निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. शांत वातावरणात निवडणूक प्रचार व चर्चा होत आहेत. नगर पंचायत अंतर्गत बाकलसर्रा, जांभळी, जुना सालेकसा, हलबीटोला येथील गरीब मागासवर्गीय मतदार आहेत.