सांस्कृतिक वारसा जपणारी महायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:05 AM2018-02-03T00:05:51+5:302018-02-03T00:06:06+5:30

माघ महिना अनेक समाज, धर्मासाठी पूर्वजांना स्मरण व पूजन करण्याचा महिना आहे. देशातील समाज व्यवस्थेत माघ पौर्णिमा व शुक्ल पक्षात कुल देवतेचे पूजन करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

Cultural heritage jayantari mahayatra | सांस्कृतिक वारसा जपणारी महायात्रा

सांस्कृतिक वारसा जपणारी महायात्रा

googlenewsNext
ठळक मुद्देकोया पुनेम महोत्सव : निसर्गाचे रक्षण व एकात्मेला पोषक

विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडी धर्मभूमी कचारगड : माघ महिना अनेक समाज, धर्मासाठी पूर्वजांना स्मरण व पूजन करण्याचा महिना आहे. देशातील समाज व्यवस्थेत माघ पौर्णिमा व शुक्ल पक्षात कुल देवतेचे पूजन करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अशातच आदिवासी समाजामध्ये आपल्या पूर्वजांना पूजन्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा वापर केला जातो. सांस्कृतिक व सामाजिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी विशाल स्वरुपात कचारगड यात्रा आयोजित केली जाते.
या यात्रेनिमित्त सकल आदिवासी समाज आद्यपूर्वजांचे पूजन करून आपण एकाच माळेतील मणके आहोत, यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जातो. एकतेचा संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजेच कचारगड यात्रा. ही सांस्कृतिक वारसा जपणारी यात्रा सिद्ध होत असून या निमित्त निसर्ग रक्षण, भूतदया आणि एकात्मतेला पोषक कृती आणि भाव निर्माण करणारी ही यात्रा आहे.
दरवर्षी माघ पौर्णिमेला पूर्वजांना स्मरण करण्याचे औचित्य साधून या कोया पुनेम महोत्सवात आदिवासी गोंडी संस्कृतीचे दर्शन घडून येते. यात्रेदरम्यान विविध देविदेवतांची नैसर्गिक पूजा, बाह्य देखावा नसून शुद्ध भाव, पारंपरिक वेषभूषा, बोली भाषा, पारंपरिक साहित्य, आयुध, गोंडी बाणा, नृत्य कला, निसर्गाने प्रदत्त केलेल्या पंचतत्वांना कायम टिकवून ठेवण्यासाठी केली जाणारी त्याची उपयोगीता व संरक्षण, या सगळ्या गोष्टी गोंडी आदिवासी प्रथमा परंपरेत व संस्कृतीमध्ये दिसून येतात.
जल, जमीन, वायू, अग्नी आणि आकाश या पाच तत्वांवर मानवाचे जीवन व अस्तित्व टिकून आहे. हे कदाचित प्रत्येक आदिवासींना कळत नकळत समजत असावे, असे त्यांच्या संस्कृतीवरुन स्पष्ट दिसून येते. निसर्गाने आपल्याला भरपूर दिले तरी त्याच्या उपयोग मात्र आवश्यकतेपूरताच झाला पाहिजे आणि उपयोग करीत निसर्गाची प्रत्येक वस्तू शाश्वत टिकून राहिली पाहिजे. याचे पुरेपूर अनुसरण गोंडी संस्कृती करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आदिवासी समाज प्रकृतीप्रेमी असून निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी शक्यतो सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. अशात इतर समाजाने यापासून बोध घेवून निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व सांस्कृतिक वारसा जपून सहकार्य करण्याचे मोठे आवाहन पेलण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे.
आदिवासी समाज प्रकृतीप्रेमी आहे. आदिवासी समाजाची ही मूळ परंपरा बनली आहे. कचारगड यात्रेत दरवर्षी पाच लाखांच्यावर भाविक येवून माघ पौर्णिमेची (कोया पुनेमी) महापूजा करुन जातात. जर एवढ्या भाविकांनी नारळ, अगरबत्ती, फळ, फूल व इतर पूजन साहित्यांचा वापर केला तर आपण अंदाज लावू शकतो की ट्रक भरुन नारळ जमा झाले असते, जसे इतर धार्मिक स्थळात जमा होतात.
त्याचप्रमाणे अगरबत्ती, प्लास्टीक पिशव्या, डिस्पोजल, पॉकीट इत्यादीचा ढिगारा तयार झाला असता. यात निसर्गाला व वातारणाला नुकसान होऊ शकला असता. प्रदूर्षण वाढला असता आणि घाण कचºयाची विल्हेवाट लावण्याचे नवीन आवाहन उभे झाले असते. ऐवढेच नाही, कचारगडसारखे धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ पवित्र राहिले नसते. परंतु आदिवासी समाजाचा याबद्दल वैज्ञानिक दृष्टीकोन व निसर्ग प्रेम समझावा लागेल.
येथे येणारे सर्व आदिवासी भाविक गरीब असो की श्रीमंत, शेतकरी असो की अधिकारी, सामान्य माणूस की राजकारणी या सर्वांनी या बाबी पाळण्याचा प्रयत्न केला. या यात्रेत काही गैरआदिवासी पर्यटक सुद्धा येतात. त्यांना सदर बाबींचे महत्व कळत नसल्याने ते लोक पर्यावरणाचे रक्षण करण्याचा दृष्टीकोणातून प्रयत्न करीत नाही. त्यामुळे अशा काही नासमज लोकांमुळे कचारगड परिसर दूषित होऊ शकतो. परंतु आदिवासी समाजाची प्रथा परंपरा पाहून अनेकांना संयम ठेवण्यास बाध्य व्हावे लागते. हा सुद्धा आदिवासी समाजाचा दृढ विश्वास, सृदृढ सांस्कृतिक वारसा व शाश्वत टिकाऊ परंपरेचा प्रभाव समझावा लागेल. एकंदरित आदिवासी समाजाच्या प्रत्येक कृतीमध्ये, कलेमध्ये तसेच पूजन विधी व राहणीमानात निसर्गप्रेम आणि निसर्गाचे संरक्षण करण्याची भावना दडलेली आहे. अशा या गोंडी संस्कृतीला सलाम.
आदिवासींची आगळीवेगळी पूजा
कचारगड यात्रेत आदिवासी समाजाचे भाविक नैसर्गिक पूजा करतात. त्यांच्या पूजेमध्ये देविदेवतांची मूर्ती स्थापित नाहीत. ज्या देविदेवतांना पूजायचे असते त्यांचे अंतकरणातून स्मरण केले जाते. म्हणजेच समोर मूर्ती ठेवून त्याला नारळ चढवणे, अगरबत्ती लावणे किंवा धूप, दीप, कापूर यासारखा देखावा करीत नाही. देविदेवतांना अर्पण करणारी कोणतीही कुत्रिम वस्तू किंवा मानवनिर्मित नसून निसर्गाने सहज दिलेली फळे, फुले व इतर तत्वे वापरली जातात. त्याद्वारे आपल्या पूर्वजांना समाधानी करण्याचा प्रयत्न व त्यातूनच स्वत:च्या मनाला मिळणारी शांती, आपल्या सांसारिक कर्तव्याचे वहन करण्याचे सामर्थ्य एवढेच अपेक्षित असते.

Web Title: Cultural heritage jayantari mahayatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.